Jain caves Maharashtra : महाराष्ट्रातील जैन लेण्यांचे सांस्कृतिक वैभव; 'महाराष्ट्रातील जैन लेणी' पुस्तकाचा सखोल आढावा
esakal February 01, 2026 05:45 PM
रोहित वाळिंबे

भारताच्या सांस्कृतिक परंपरेमध्ये जैन तत्त्वज्ञानाचे स्वतंत्र स्थान आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य यांची शिकवण देणाऱ्या या विचारधारेने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवातही मोलाची भर घातली असून, राज्यातील जैन लेण्या त्याची साक्ष देत आजही उभ्या आहेत. काळाच्या ओघात काहीशा अपरिचित होऊन गेलेल्या याच लेण्यांची विस्तृत ओळख सरला भिरूड यांनी त्यांच्या ‘महाराष्ट्रातील जैन लेणी’ या पुस्तकाच्या माध्यमातून करून दिली आहे.

महाराष्ट्रातील जैन लेण्या या स्थापत्यशास्त्राच्या आणि शिल्पकलेच्याही दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहेतच, पण त्या प्राचीन काळातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनाचे कातळात कोरलेले दस्तऐवज आहेत याची जाणीव हे पुस्तक वाचताना प्रखरतेने होते. पुस्तकात सुरुवातीला जैन तत्वज्ञान, २४ तीर्थंकर, जैन धर्माचा संक्षिप्त इतिहास आणि भारतातील त्याचा विस्तार यांचा आढावा घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात जैन धर्म कसा आणि केव्हा रुजला, व्यापारी वर्ग, राजसत्ता आणि स्थानिक समाज यांची त्यात काय भूमिका होती, याचीही माहिती यात ओघाने देण्यात आली आहे. ही माहिती वाचकाला पुढील प्रकरणांतील लेण्यांची वर्णने समजावून घेण्यासाठी उपयुक्त ठरणारी आहे.

या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या भौगोलिक-सांस्कृतिक विविधतेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश या भागांतील लेण्यांचा स्वतंत्रपणे विचार करताना त्या त्या प्रदेशातील राजकीय सत्ताकेंद्रे, व्यापारी मार्ग आणि धार्मिक प्रवाह यांचा परस्परसंबंध लेखिकेने नेमकेपणे उलगडून सांगितले आहेत. त्यामुळे जैन लेणी ही केवळ एखाद्या संप्रदायाची मर्यादित निर्मिती नसून, तत्कालीन सामाजिक रचनेचा अविभाज्य भाग होती हे ठळकपणे अधोरेखित होते.

Premium|Kamathipura Book: कामाठीपुराच्या विविधतेचा सुरेख कोलाज; 'क्लोज एन्काउंटर्स' पुस्तकाचा आढावा

पुण्याजवळील पाले येथील जैन लेणी, लोहगडवाडी लेणी, धाराशिव येथील लेणी, वेरूळ, आंबाजोगाई, जुन्नर, दौलताबाद, खरोसा लेणी तसेच नाशिक जिल्ह्यातील जैन लेणी यांची तपशीलवार माहिती, तेथील रचना शिल्पांची सविस्तर माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. याशिवाय चामरलेणी किंवा गजपंथ लेणी समूहातील अंजनेरी, मांगीतुंगी, त्रिंगलवाडी, वाशाळे किंवा वासे आणि अंकाई जैन लेणी या स्थळांचेही ऐतिहासिक व स्थापत्यदृष्ट्या महत्त्व लेखिकेने दिले आहे. खानदेशातील भामेर येथील लेणी, मोइंदे तर्फ हवेली, तोरणमाळ येथील लेणी, कन्हेरगडावरील लेणी आणि धाबादेव लेणी येथील लेणी यांचिही सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यासोबतच शिरपूर तालुक्यातील बाबाकुंवर गावातील स्तंभलेख आणि श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर, शिरपूर (जि. वाशिम) या महत्त्वाच्या जैन सांस्कृतिक स्थळांचीही सविस्तर माहिती लेखिकेने या पुस्तकात दिली आहे.

प्रत्येक लेणीसमूहाच्या बाबतीत त्याचे भौगोलिक स्थान, ऐतिहासिक कालखंड, स्थापत्य रचना, त्यातील शिल्पे, लेख आणि त्यामागील धार्मिक संकल्पना यांचा सुसंगत आणि माहितीपूर्ण आढावा या पुस्तकात घेण्यात आल्यामुळे या पुस्तकाला संदर्भ ग्रंथाचे स्वरूप आले आहे. जैन लेण्यांतील तीर्थंकरांच्या शिल्पांची सखोल माहिती त्यांच्या मुद्रा, यक्ष-यक्षिणींची उपपत्ती त्यांच्या अलंकरणाची सूचक शैली याचे वर्णन वाचताना लेखिकेचा व्यासंग पाहून थक्क व्हायला होते.

लेखिकेने काही ठिकाणी बौद्ध आणि हिंदू लेण्या तसेच जैन लेण्या यांच्यातील साम्य-भेद मांडताना अत्यंत संयत मांडणी केली असल्याने धार्मिक परंपरांतील साम्य आणि भेद वाचकांच्या लक्षात येतात, मात्र एकाचे गुणगान करून दुसऱ्यास कमी लेखण्याचा प्रकार लेखिकेने केला नसल्याने कोणतीही कटुता निर्माण होणार नाही याची पुरेशी काळजीही घेण्यात आली आहे. ‘‘इतिहासाच्या प्रवाहात अनेक उलथापालथी झाल्या, विविध विचारांच्या लाटा आल्या, तरीही जैन मूल्यांचा हा किनारा महाराष्ट्रातील लेण्यांमध्ये भक्कम उभा राहिला. या लेण्यांचे महत्त्व, त्यातील शिल्पवैभव आणि त्यांच्या माध्यमातून प्रकट होणारा जैन तत्त्वज्ञानाचा वारसा संकलित करून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे हा ग्रंथ केवळ भूतकाळाचा दस्तऐवज नसून, मानवतेसाठी शाश्वत ठरलेल्या जैन मूल्यांची आठवण करून देणारा सांस्कृतिक दालन आहे.’’ पुस्तकाच्या निर्मितीमागील प्रेरणा नेमकी कोणती याची उकल या उल्लेखाने सहज होऊन जाणारी आहे. संदर्भग्रंथ, शिलालेखांचे उल्लेख आणि संशोधनांचा आधार घेतलेला असल्यामुळे पुस्तकाचे संदर्भ मूल्य वाढले आहे. तसेच रंगीत छायाचित्रे आणि नकाशे यामुळे पुस्तक आकर्षक झाले आहे.

‘महाराष्ट्रातील जैन लेणी’ हे पुस्तक जितके इतिहासप्रेमींसाठी उपयुक्त आहे, तितकेच ते पर्यटकांना उपयुक्त माहिती देणारे आणि धर्म व कला यांची आवड असणाऱ्यांची जिज्ञासा शमवणारे आहे. त्यामुळेच संशोधक, विद्यार्थी, इतिहासप्रेमी तसेच जैन तत्त्वज्ञानाची आवड असणाऱ्या सर्वांनी हे पुस्तक आवर्जून वाचायला हवे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.