मुंबईबद्दल द्वेष या अर्थसंकल्पातून दिसतो; STT कर वाढीवरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
Marathi February 02, 2026 12:25 AM

“हा केंद्रीय अर्थसंकल्प हेच दर्शवतो की, केंद्र सरकार बाजारपेठेतील वास्तवापासून किती दूर आहे आणि त्यांच्या मनात मुंबईबद्दल किती द्वेष आहे”, अशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली आहे. X वर एक पोस्ट करत ते असं म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “बाजारातील अस्थिरता, गगनचुंबी महागाई आणि रुपयाचे अवमूल्यन सुरू असतानाही, केंद्र सरकारने स्वार्थापोटी एसटीटी कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आधीच ओझ्याखाली दबलेल्या गुंतवणूकदारावर अधिक भार पडेल आणि जनतेच्या खर्चावर सरकारचा महसूल वाढवण्यास मदत होईल.”

ते म्हणाले, “हिंदुस्थानची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत प्रमुख शेअर्स बाजार (Exchanges) आहेत. देशातील सर्वाधिक व्यवहार आणि संस्थात्मक तसेच किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग मुंबईतूनच होतो. एसटीटी मधील कर वाढीचा थेट फटका व्यापाराला बसेल, ज्यामुळे मुंबईतील रोजगाराच्या संधी आणि आर्थिक विकासावर गदा येईल.

आदित्य ठाकरे म्हणाले की, “एकीकडे मुंबईत कर वाढवला असताना, गिफ्ट सिटीमधील व्यवहारांना मात्र सोयीस्करपणे एसटीटीमधून सवलत देण्यात आली आहे. हा मुंबईचे आर्थिक महत्त्व कमी करून ते जाणीवपूर्वक गिफ्ट सिटीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. एकाच देशात, एकाच गुंतवणूकदारासाठी मुंबई आणि गिफ्ट सिटीमध्ये वेगळी कररचना असणे धक्कादायक आहे. मुंबईला आयएफएससी (IFSC) दर्जा देण्याऐवजी केंद्र सरकार मुंबईला केवळ पक्षपातीपणा आणि द्वेष भेट म्हणून देत आहे.”

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.