गेल्या काही दिवसांपासून गगनभरारी घेणाऱ्या सोने-चांदीच्या बाजारात अचानक मोठी पडझड झाली आहे. शुक्रवारी (ता.३०) गेल्या ४५ वर्षांतील सर्वांत मोठी घसरण नोंदवत चांदीने एकाच दिवसात २७ टक्क्यांची आपटी खाल्ली, तर सोन्याने १९८३ नंतरचा सर्वांत वाईट दिवस अनुभवला. एका दिवसातच चांदीचा भाव चार लाख रुपयांच्या उच्चांकावरून सुमारे १,२८,००० रुपयांनी कमी झाला. त्याचप्रमाणे सोन्याच्या भावातही मोठी घसरण झाली. त्यानंतर १ फेब्रुवारीलाही सोने-चांदीचे भाव घसरले. यामुळे सोने-चांदीचा बुडबुडा फुटल्याचे संकेत मिळाले. या घसरणीने सोने-चांदी ईटीएफमध्येही नऊ ते चौदा टक्क्यांची घसरण झाली. जानेवारीमध्ये चांदीच्या भावात ५६ टक्क्यांनी वाढ झाली, त्यामुळे ही घसरण अपेक्षित होती.
घसरणीची प्रमुख कारणेचीनमधील मागणीत घट : जागतिक स्तरावर सोन्याचा मोठा ग्राहक असलेल्या चीनमध्ये मागणी कमी झाल्याच्या बातम्यांमुळे बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
नफावसुली : भाव ऐतिहासिक उच्चांकावर असल्याने बड्या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री करून आपला नफा पदरात पाडून घेतला.
जागतिक संकेत : अमेरिकेतील व्याजाचे दर आणि डॉलरचा मजबूत होणारा दर यामुळे दबाव वाढला. तसेच फेडरल रिझर्व्हचे अपेक्षित नेतृत्व बदल आणि त्या बदलामुळे कडक आर्थिक धोरणाची भीती वाढल्यामुळेही विक्री वाढली.
सोने-चांदीचे गुणोत्तर
सोने आणि चांदीच्या भावाचे गुणोत्तर सध्या सोने-चांदीचे गुणोत्तर ४६:१ वर आले आहे. गेल्या १० वर्षांची सरासरी ८०:१ आहे. जेव्हा हे गुणोत्तर ५०:१ च्या खाली येते, तेव्हा चांदी महाग होते. यापूर्वी हे गुणोत्तर खाली आल्यानंतर चांदीत सोन्याच्या तुलनेत मोठी घसरण पाहायला मिळाली. सोप्या भाषेत सांगायचे, तर दहा ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी किती किलो चांदी लागेल, हे या गुणोत्तरावरून समजते.
गुंतवणूकदारांसाठी ‘रोडमॅप’
रिबॅलन्सिंग : जेव्हा चांदी झळाळत असते, तेव्हा ती सट्टेबाजीची अंतिम पायरी असते. आता बाजार कोसळल्यामुळे, ही वेळ पोर्टफोलिओ संतुलित करण्याची आहे.
ॲव्हरेजिंग : ज्यांना दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी ही घसरण म्हणजे खरेदीची एक चांगली संधी असू शकते. मात्र, एकदम मोठी रक्कम न गुंतवता टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी.
सोन्याकडे कल : चांदीच्या तुलनेत सोने कमी अस्थिर असते. सुरक्षिततेसाठी सोन्याला प्राधान्य द्यावे, कारण चांदीमध्ये होणारे चढ-उतार अत्यंत वेगवान आणि जोखीमयुक्त असतात.
पुढील दिशा काय असेल?
सध्या बाजार ‘करेक्शन’ मोडमध्ये आहे. सोने प्रति १० ग्रॅम १.४० लाख रुपयांपर्यंत आणि चांदी प्रतिकिलो २.८० लाख रुपयांच्या पातळीपर्यंत स्थिरावण्याची शक्यता आहे.
निष्कर्ष : सोने-चांदीच्या बाजारात झालेली ही घसरण देश-परदेशातील आर्थिक संकेत, चलनमहत्त्व आणि नफावसुली यांच्या मिश्रणामुळे आली आहे. सध्याच्या घडीला हा अंत नाही; पण निश्चितच सतर्कतेचा काळ आहे.
सोने-चांदीमधील गुंतवणूक ही संयमाची कसोटी पाहणारी असते. तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि स्वतःच्या जोखमीचा विचार करून निर्णय घेणे हिताचे ठरेल.
(हा लेख केवळ माहितीसाठी आहे. बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असल्याने, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.)