बुटाला हायस्कूलमध्ये 'युवा सप्ताह'
esakal February 03, 2026 04:45 AM

बुटाला हायस्कूलमध्ये
‘युवा सप्ताह’
गावतळेः येथील श्रीमान मथूरभाई बुटाला हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘युवासप्ताह’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रभातफेरी आणि त्यांच्या जीवनावरील व्याख्यानाने या सप्ताहाचा शानदार प्रारंभ झाला. सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. स्पर्धांची रेलचेल आणि ज्ञानशिदोरी सप्ताहादरम्यान खो-खो, कबड्डीसारखे सांघिक सामने आणि वैयक्तिक क्रीडा स्पर्धा झाल्या तसेच चित्रकला, निबंध आणि पाककला स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘ज्ञानशिदोरी’ उपक्रमांतर्गत भव्य ग्रंथप्रदर्शन आयोजित केले होते.
---------------
जिल्हास्तरीय स्पर्धेत
अनुश्री गौरव प्रथम
संगमेश्वर ः माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धेची अंतिम फेरी माखजन प्रशालेच्या गुरूदक्षिणा सभागृहात झाली. प्राथमिक निवडफेरीत या स्पर्धेच्या अंतिम फेरीत अनुश्रीसोबतच लहान-मोठ्या गटात मिळून आणखी १५ मुलांची निवड झाली होती. पाचवी ते आठवी अशा लहान गटातील स्पर्धेतून परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचलित युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरूकुल विभागात सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या अनुश्रीने स्पर्धेत अनुक्रमे स्वतःच्या पसंतीचे भावगीत ‘ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता’ आणि परीक्षकांच्या पसंतीचे ‘बोलावा विठ्ठल’ हे भक्तीगीत सादर केले. कठीण गाणे सहजतेने आणि सुरेल सादर करणाऱ्या अनुश्रीच्या सादरीकरणाची परीक्षकांनी प्रथम पसंतीचे सादरीकरण म्हणून निवड केली. प्रशस्तीपत्रक रोख पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह असे लहान गटाच्या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक उदय गोखले यांच्या हस्ते देण्यात आले. रत्नागिरीतील गायक आनंद पाटणकर आणि व्हायोलिनवादक गोखले यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. तसेच प्रसिद्ध हार्मोनियम वादक चैतन्य पटवर्धन, तबलावादक प्रथमेश शहाणे आणि सूरज पाटणकर यांनी साथसंगत केली.
--------
अजित पवार यांच्या
अस्थिकलशाचे दर्शन
सावर्डे ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन सावर्डे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतले. यानिमित्त सावर्डे कुंभारवाडी व साळवीवाडी येथील स्थानिक भजनी मंडळाने दोन तास भजनाचा कार्यक्रम करून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. अस्थिकलशाचे दर्शन घेण्यामध्ये आमदार शेखर निकम, पूजा निकम, जयंद्रथ खताते, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, सह्याद्री परिवारातील सदस्य, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतक यांचा प्रामुख्याने समावेश होता. त्या अनुषंगाने आमदार निकम यांचे जनसंपर्क कार्यालय येथे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.