आधुनिक तंत्रज्ञानासह तरुणांनी देश सेवेस सज्ज व्हावे :कर्नल कुलदीप करपे
esakal February 03, 2026 04:45 AM

KTR26B09196
साडे (ता. करमाळा) ः शहीद मेजर निलंगे यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना कर्नल करपे.

आधुनिक तंत्रज्ञानासह तरुणांनी देशसेवेस सज्ज व्हावे
कर्नल कुलदीप करपे; शहीद मेजर अमोल निलंगे स्मृतीदिनी अभिवादन

सकाळ वृत्तसेवा
केत्तूर, ता. २ ः तरुणांना देशसेवेसाठी सज्ज व्हावे, तंत्रज्ञानाधारित युद्धपद्धती, सायबर सुरक्षा, दहशतवाद व सीमासुरक्षेतील बदलती परिस्थिती यांचा सामना करण्यासाठी सक्षम, शिस्तबद्ध व देशभक्त तरुणांची गरज असल्याचे प्रतिपादन कर्नल कुलदीप करपे यांनी केले.

साडे (ता. करमाळा) येथे स्मारक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला शहीद मेजर अमोल निलंगे स्मृतीदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात झाला. यावेळी मेजर निलंगे यांना अभिवादन करण्यात आले.
करपे म्हणाले, शिक्षणासोबतच शारीरिक तंदुरुस्ती, नैतिक मूल्ये व राष्ट्रनिष्ठा जोपासण्याचे आवाहन करत त्यांनी तरुणांनी सैन्य व सुरक्षादलांमध्ये करिअर करण्याचा विचार करावा, असे सांगितले.
या सोहळ्यास भारतीय सेनेचे अधिकारी कर्नल केदार भिडे व कर्नल कुलदीप करपे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थान द. सो. पं. समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी भूषविले. उपस्थित मान्यवरांनी शहीद मेजर अमोल निलंगे यांच्या स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून एन.सी.सी. कॅडेट्ससह श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी कर्नल केदार भिडे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलिस निरीक्षक रणजित माने, डॉ. अॅड. बाबूराव हिरडे, अवचर, प्रा.बाळकृष्ण लावंड यांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. प्रचिती पुंडे यांनी शहीद मेजर अमोल निलंगे स्मारक समितीस पोडियम भेट स्वरूपात प्रदान केले.

यांना सामाजिक दायित्व पुरस्कार
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शहीद स्मृती पुरस्काराने सन्मानित केले. यामध्ये पोलिस निरीक्षक रणजित माने, तहसीलदार शिल्पा ठोकडे, ग्रामीण भागातील नागरिक सेवेसाठी गुलाबराव देवकते, पक्षी अभ्यासक प्रा. कल्याणराव साळुंके, प्रगतशील बागायतदार संभाजी भोसले, आदर्श सैनिक किरण ढेरे व आदर्श कला शिक्षक सचिन शिंदे यांचा समावेश होता. उपक्रमशील शाळा पुरस्कार पीएमश्री साधनाताई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा क्र.१ यांना प्रदान करण्यात आला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.