रस्ता सुरक्षा अभियानात जागृती, मार्गदर्शन
esakal February 03, 2026 09:45 AM

सोमाटणे, ता. २ : महामार्ग पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा अभियानाची विविध उपक्रमांसह नुकतीच सांगता झाली. वडगाव मावळ विभागातील महामार्ग पोलिसांनी पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग, पुणे-मुंबई महामार्ग, कोलाड महामार्ग तसेच लगतच्या शाळा व औद्योगिक परिसरात हे अभियान राबवण्यात आले.
अभियानांतर्गत द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका येथे वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन, वेग नियंत्रणाचे महत्त्व, वाहनांची नियमित तपासणी, चालक व वाहकांनी ठराविक अंतरानंतर विश्रांती घेणे, आरोग्य तपासणी, संतुलित आहार-विहाराचे महत्त्व, नेत्र तपासणी, लेन शिस्त आणि सीट बेल्ट वापरण्याची गरज याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
उर्से येथील पद्मावती विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या सहभागातून रस्त्यालगतच्या गावांमध्ये जनजागृती फेरी काढण्यात आली.
याशिवाय उर्से येथील के. के. नाग प्रा. लि. तसेच पौड येथील फ्लोरोसिस प्रा. लि. आदी कंपन्यांतील कामगार व वाहनचालकांना वाहतूक नियमांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
‘‘महामार्गालगतच्या गावांत नागरिकांना वाहन चालविताना मोबाइलचा वापर टाळणे, हेल्मेट वापरण्याची गरज, व्यसनमुक्ती, वेगमर्यादा पाळणे, ओव्हरटेक करताना काळजी घेणे, सूचना फलकांचे पालन तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन याबाबत जागृती करण्यात आली,’’ अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद पवार यांनी दिली.

PNE26V91979

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.