Kolhapur Election : मतांसाठी लाखोंची तयारी! चाकरमानी मतदारांना गावी आणण्यासाठी उमेदवारांची धडपड
esakal February 03, 2026 07:45 PM

उत्तूर : गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील जिल्हा परिषद निवडणुकीतील अटीतटीची लढत लक्षात घेऊन मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर शहरांमध्ये असणाऱ्या चाकरमानी मतदारांना मतदानासाठी आपापल्या गावी आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची तयारी उमेदवारांनी दाखविली आहे. यावरून या तालुक्यांमध्ये हायव्होल्टेज लढत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

अशोक तोरस्कर

तिन्ही तालुक्यांत एकूण ११ जिल्हा परिषदेचे गट व २२ पंचायत समितीचे गण आहेत. जिल्हा परिषद गट पुनर्ररचनेत नव्याने गावांची अदलाबदल झाली आहे. तिन्ही तालुक्यांतील सर्वच जिल्हा परिषद मतदारसंघात समाविष्ट प्रत्येक गावातील सरासरी १०० ते १५० ग्रामस्थ कमी-जास्त प्रमाणात मुंबई, पुणे, इचलकरंजी व इतरत्र नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्याला आहेत.

Kolhapur ZP : सा. रे. पाटील यांच्या ताकदीने इतिहास घडला; यशोदा कोळी अध्यक्षपदी, त्यांचा प्रेरणादायी प्रवास

तिन्ही तालुक्यांत मिळून साधारण दहा हजारांपर्यंत मतदार अन्यत्र वास्तव्यास असले तरी यातील बहुतांश मतदारांनी आपली नावे गावातील मतदार यादीतच ठेवली आहेत. पूर्वी सर्वसाधारणपणे गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत या मतदारांना मतदानासाठी आवर्जून आणले जायचे. मात्र, अलीकडे होणाऱ्या चुरशीच्या सर्वच निवडणुकीत या मतदारांना गावी आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहेत.

यावेळची निवडणूक चुरशीची होणार आहे. प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी या चाकरमान्यांच्या मतदानावर डोळा ठेवला आहे. यामुळे बाहेरच्या मतदारांना महत्त्व आले आहे. गावागावांतील अशा मतदारांची माहिती गोळा करण्याचे काम उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे.

Kolhapur Politics : भाजपविरोधात राष्ट्रवादींची मोठी चाल; कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत रंगणार प्रतिष्ठेचा महासंग्राम

प्रत्येक गावातील आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांना सूचना देऊन आपापल्या गावातील बाहेरगावच्या मतदारांचे पत्ते व संपर्कासाठी मोबाईल नंबर जमा करण्याचे काम जोरात सुरू आहे. बाहेरगावच्या मतदारांना खास गाडीची व्यवस्था करून आणणे, त्यांचे खाणे-पिणे, या मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन जाणे, त्यांना मतपत्रिकेवरील आपल्या उमेदवारांचा क्रमांक व चिन्ह समजावून सांगणे, यासाठी कार्यकर्त्यांची स्वंतत्र यंत्रणा कार्यरत झाली आहे.

खानावळी, धाबे गजबजलेनिवडणुकीच्या प्रचारात रंगत आली आहे. प्रचारासाठी केवळ पाच-सहा दिवसांचा कालावधी उरला असून, सत्तेसाठी नेत्यांनी अस्तित्व पणाला लावले आहे. खानावळी बरोबरच हॉटेल आणि गावच्या बाहेर असणारे धाबे कार्यकर्त्यांनी ओसंडून वाहत आहेत.

या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेना, भाजप, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष, ताराराणी आघाडीचे उमेदवार ताकदीने उतरले आहेत. अंतिम ध्येय गाठण्यासाठी सर्वच शक्तींचा वापर जोरात सुरू आहे.

त्यामुळे जेवणावळींसह काही ठिकाणी ‘लक्ष्मी दर्शन’ही आतापासूनच सुरू झाल्याची चर्चा आहे. काही मतदार सार्वजनिक ठिकाणी जाऊन जेवण टाळतात. उमेदवारांनी त्यांची अडचण समजून घेत त्यांना घरीच मांसाहार, शाकाहारी जेवणाचे पार्सल देण्याची व्यवस्था केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.