क्रूरतेचा कळस… गाय दूध देत नव्हती म्हणून चक्क… त्या धक्कादायक घटनेने अख्खा देश हादरला
admin February 04, 2026 04:24 PM
[ad_1]

Crime News : मध्य प्रदेशातील टीकमगड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. केवळ काही लिटर दूध मिळवण्याच्या लालसेपोटी एका दूध विक्रेत्याने मुक्या जनावरावर अशी क्रूरता केली की हे ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

ही घटना टीकमगड शहरातील बैकुंठ मोहल्ल्यातील आहे. येथे सत्येंद्र यादव नावाचा व्यक्ती गाय- म्हैस पाळून दूध विक्रीचा व्यवसाय करतो. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी त्याच्या एका गायीच्या बछड्याचा आजाराने मृत्यू झाला होता. बछड्याच्या मृत्यूनंतर मातृत्वाच्या वेदनेत असलेल्या त्या गायीने दूध देणे बंद केले.

दुधासाठी किळसवाणा आणि अमानवी मार्ग

गायीचे दूध मिळावे यासाठी आरोपी सत्येंद्र यादवने अत्यंत घृणास्पद आणि अमानवी कृत्य केले. त्याने मृत बछड्याचे डोके धडापासून वेगळे केले आणि बछड्याच्या कातड्यात भूसा भरला. त्यानंतर त्या कापलेल्या डोक्याला गोठ्याच्या भिंतीवर अशा पद्धतीने टांगले की गाय ते पाहू शकेल. गायेला आपला बछडा जिवंत असल्याचा भास व्हावा आणि ती पुन्हा दूध द्यावी हाच आरोपीचा उद्देश होता.

हा अमानुष प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. गोठ्यातील दृश्य पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच बजरंग दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. दृश्य पाहून कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी बछड्याचे कापलेले डोके घेऊन चकरा चौकात पोहोचले आणि रस्ता अडवून जोरदार आंदोलन केले. आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली.

पोलिसांची तत्काळ कारवाई

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत योग्य ती कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. त्यानंतर रस्ता मोकळा करण्यात आला. एएसपी विक्रम सिंह कुशवाहा यांनी माहिती देताना सांगितले की, आरोपी सत्येंद्र यादव याच्याविरोधात पशु क्रूरता प्रतिबंधक अधिनियम आणि गोवध प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘मुक्या जनावरांवर अशी अमानुष कृत्ये कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाहीत’ असे त्यांनी स्पष्ट केले.

ही घटना केवळ कायद्याचा भंग नसून समाजातील माणुसकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. काही पैशांच्या लालसेपोटी मुक्या प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात कठोर भूमिका घेणे काळाची गरज असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

 


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.