संजू सॅमसनबाबत सूर्यानं 'तो' निर्णय घेतलाच,अभिषेक शर्माचा सलामीचा साथीदार बदलला
युवराज जाधव February 04, 2026 11:13 PM

नवी मुंबई :  7 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत टी 20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या टी 20 वर्ल्ड कपपूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सराव सामना नवी मुंबईत सुरु आहे. सूर्यकुमार यादवनं या सराव सामन्यात अनेक प्रयोग केले आहेत. त्यातील एका प्रयोगाचा भाग म्हणून सूर्यकुमार यादवनं फॉर्ममध्ये नसलेल्या संजू सॅमसनच्या जागेत बदल केला आहे. अभिषेक शर्मासोबबत सलामीला ईशान किशनला पाठवलं. ईशान किशननं या संधीचं सोनं केलं. 

संजू सॅमसनच्या जागी ईशान किशनला संधी 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नुकतीच 5 सामन्यांची टी 20 मालिका पार पडली. या मालिकेत अभिषेक शर्मासोबत सलामीवीर म्हणून संजू सॅमसनला संधी देण्यात आली होती. संजू सॅमसनला या पाच सामन्यांच्या मालिकेत दमदार फलंदाजी करण्यात अपयश आलं. तेव्हापासून संजू सॅमसनच्या जागी ईशान किशनला संधी मिळणार अशा चर्चा सुरु होत्या. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सराव सामन्याच्या निमित्तानं कर्णधार सूर्यकुमार यादव यानं अभिषेक शर्माचा सलामीचा साथीदार बदलला आहे. अभिषेक शर्माच्या जागी सलामीला संजू सॅमसन ऐवजी ईशान किशनला पाठवण्यात आलं.

ईशान किशनकडून संधीचं सोनं 

कॅप्टन सूर्यकुमार यादवनं ईशान किशनवर जो विश्वास दाखवला तो त्यानं सार्थ केला. ईशान किशननं 20 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं 7 षटकार आणि 2 चौकारांच्या जोरावर  53 धावा केल्या. यानंतर त्याला रिटायर्ड आऊट करत माघारी बोलावण्यात आलं. अभिषेक शर्माला देखील 24 धावांवर खेळत असताना सूर्यकुमार यादवनं परत बोलावलं. 

तिलक वर्मा फिट 

भारताचा मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज तिलक वर्मा दुखापतीमुळं काही कारणांमुळं संघाबाहेर होता. तो न्यूझीलंड विरुद्धचे काही सामने खेळला नव्हता. आज त्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना 45  धावा केल्या. 

सूर्यकुमार यादवचे प्रयोग

भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामना खेळताना अनेक प्रयोग केले आहेत. संजू सॅमसनला सलामीला न पाठवणे, संजूच्या जागी सलामीला ईशान किशनला संधी देणे, ईशान किशन आणि अभिषेक शर्माला रिटायर्ड आऊट करणे याचा समावेश आहे. 

दरम्यान, टी 20 वर्ल्ड कपला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.  भारतानं 2024 मध्ये टी 20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवलं होतं. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारत पुन्हा टी 20 वर्ल्ड कप जिंकणार का पाहावं लागेल. भारतानं टी 20 वर्ल्ड कपचं दोन वेळा विजेतेपद मिळवलं आहे. आता तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्याची संधी आहे.  

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.