नाशिक: जिल्ह्यात यंदा टंचाईवरील उपाययोजनांसाठी सात कोटी ३८ लाख २५ हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यातील एक हजार ८४ गाव-वाड्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. या गाव-वाड्यांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी आराखड्यात १६२ टँकर प्रस्तावित करण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने धरणे-तलाव तुडुंब भरली आहेत. तसेच गावपातळीवर साठवणूक तलाव व विहिरींमध्ये आजमितीस मुबलक साठा उपलब्ध आहे. परिणामी टंचाईचा पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात उपाययोजनांची गरज भासली नाही. परंतु, जानेवारी ते मार्च तसेच एप्रिल ते जून अशा दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात टंचाईच्या झळा तीव्र होणार आहे.
त्यामुळे संभाव्य टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा तयार केला आहे. त्यात टँकरने पाणीपुरवठ्यासोबतच विहिरी अधिग्रहण व प्रगतिपथावरील नळयोजना पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्ह्यात यंदा टंचाईचा पहिला टप्पा निरंक गेला. पण, प्रशासनाने टंचाईच्या अनुषंगाने दुसरा व तिसरा टप्पा मिळून जिल्ह्यात १६२ टँकर प्रस्तावित करण्यात आले आहेत.
या टँकरकरिता सहा कोटी ३६ लाख ४८ हजारांचा निधी प्रस्तावित केला आहे. याव्यतिरिक्त खासगी विहिरी अधिग्रहणासाठी एक कोटी एक लाख ७७ हजार रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत एकूण १४ प्रगतिपथावरील नळयोजना पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.
यंदा पाच टँकर अधिक
जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्चपासून जिल्ह्यात टंचाईच्या झळा जाणवू लागल्या होत्या; तर मेपासून अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. तरीही काही तालुक्यांत जूनच्या मध्यापर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. त्या वेळी टँकरची सर्वोच्च संख्या १५८ च्या आसपास पोहोचली होती. त्या तुलनेत यंदा उन्हाळ्यात अधिकच्या चार ते पाच टँकरची गरज भासू शकते.
प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! ‘छत्रपती संभाजीनगर-गुंटूर एक्सप्रेस’ रेल्वे ६५ दिवस रद्द; नगरसोल एक्स्प्रेस विलंबाने धावणार..टंचाई आराखडा
संभाव्य टंचाईग्रस्त गावे : १०८४
पाणीपुरवठ्यासाठी टँकर : १६२
प्रगतिपथावरील नळयोजना : १४