नवजात शिशूंनाही मिळणार वैद्यकीय उपकरणे
esakal February 06, 2026 07:45 AM

पिंपरी, ता. ५ : ग्रामीण भागातील अनेक रुग्णालयांमध्ये नवजात शिशूंच्या उपचारांसाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणांची कमतरता जाणवत आहे. वेळेवर योग्य सुविधा उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे अनेक ठिकाणी उपचारांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. त्यावर उपाय म्हणून ग्रामीण रुग्णालयांना आवश्यक वैद्यकीय उपकरणे दान करण्याचा उपक्रम आयांश फाउंडेशन राबवीत आहे.
गरजू ठिकाणी आवश्यक वैद्यकीय उपकरणे पोहोचवून नवजात शिशूंच्या आरोग्यसेवेला बळकटी देण्याच्या उद्देशाने आयांश फाउंडेशनने उपकरणे दान करण्याचा सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. बालआरोग्य व ग्रामीण आरोग्यसेवा सुधारण्यासाठीही फाउंडेशन विविध उपक्रम राबविते आहे. फाउंडेशनच्या संचालिका अपर्णा देसाई व संचालक संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली संस्था ग्रामीण भागातील नवजात शिशूंच्या आरोग्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. ग्रामीण भागातील नवजात शिशूंसाठी उपचार करणारी रुग्णालये व आरोग्य केंद्रांनी, त्यांना आवश्यक वैद्यकीय उपकरणांबाबत आयांश फाउंडेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. प्राप्त होणाऱ्या विनंत्यांचा अभ्यास करून गरज व तातडीने मदत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
संस्थेकडे उपलब्ध मर्यादित संसाधनांमुळे सर्व विनंत्या पूर्ण करणे शक्य होणार नाही, याची नोंद घेणे आवश्यक आहे. तरीही, अत्यावश्यक गरज असलेल्या ठिकाणी मदत देण्यास प्राधान्य दिले जाईल. या उपक्रमाची अधिक माहिती किंवा आवश्यक तपशील पाठवण्यासाठी ९२७२११०९५५ या व्हॉटसॲप क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन आयांश फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
.....

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.