झाशी (उत्तर प्रदेश) : झाशी जिल्ह्यातील राक्सा पोलीस स्टेशन हद्दीतील सुमारे ५०० वर्षे जुन्या प्राचीन शिवमंदिराच्या गर्भगृहात गाडलेला खजिना सापडल्याची अफवा (Ancient Shiva Temple) सोमवारी पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मंदिर परिसरात व आजूबाजूच्या गावांतून शेकडो नागरिकांनी गर्दी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना तातडीने घटनास्थळी धाव घ्यावी लागली.
महाशिवरात्रीपूर्वी सुशोभीकरणादरम्यान उघडकीस आले अवशेषवृत्तानुसार, आगामी महाशिवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात सुशोभीकरण व दुरुस्तीचे काम सुरू होते. याच दरम्यान, कामगारांना गर्भगृहाच्या एका कोपऱ्यात सुमारे चार फूट खोल खड्डा दिसून आला. तपासणी करत असताना त्यामध्ये तुटलेली प्राचीन भांडी व काही वस्तू आढळून आल्या. ही माहिती तात्काळ मंदिराच्या पुजाऱ्यांना देण्यात आली.
अफवा पसरताच जमली मोठी गर्दीमंदिरात दडलेला खजिना सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे परिसरातील तसेच आसपासच्या गावांतील नागरिक मोठ्या संख्येने मंदिरात दाखल झाले. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी राक्सा पोलिसांनी मंदिर परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही घटनेची माहिती देण्यात आली.
पुरातत्व विभागाची औपचारिक चौकशी सुरूघटनेची माहिती मिळताच पुरातत्व विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अधिकृत उत्खनन करताना प्राचीन भांडी, ब्रिटिशकालीन नाणी, सिंधिया राजवंशातील नाणी तसेच विविध धातूंच्या वस्तूंचे अवशेष सापडले. सर्व वस्तू ताब्यात घेऊन सुरक्षित जतन करण्यात आल्या असून त्यांची सखोल तपासणी सुरू आहे.
जुन्या घराचा पाया खोदताना सापडला ब्रिटिशकालीन खजिना! ढिगाऱ्यातून बाहेर आला 'गुप्तधनाचा' ठेवा; चांदीच्या नाण्यांसह मौल्यवान वस्तू आढळल्या बोगद्यासारखी रचना आढळल्याचा पुजाऱ्यांचा दावामंदिराचे पुजारी मोहन गिरी यांनी सांगितले की, बांधकामादरम्यान बोगद्यासारखी रचना किंवा जुन्या उत्खननाच्या खुणा आढळून आल्या. काम करताना जमिनीचा काही भाग खराब झाल्याने जुनी गाडलेली रचना उघडकीस आली असावी. सापडलेल्या वस्तू अत्यंत प्राचीन असल्याचे त्यांनी नमूद केले.
ब्रिटिश-सिंधिया काळातील नाण्यांची प्राथमिक पुष्टीपुरातत्व विभागाचे उपअधीक्षक समीर दिवाण यांनी सांगितले की, सापडलेली नाणी ब्रिटिश व सिंधिया काळातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सध्या त्यांच्यावर रासायनिक प्रक्रिया व तांत्रिक तपासणी सुरू असून, अहवालानंतर अधिकृत माहिती जाहीर केली जाईल.
तपास अहवालानंतर ठरणार ऐतिहासिक महत्त्वसध्या मंदिर परिसर पोलीस व प्रशासनाच्या देखरेखीखाली आहे. पुरातत्व विभागाच्या अंतिम अहवालानंतरच सापडलेल्या वस्तू ऐतिहासिक खजिन्याचा भाग आहेत की प्राचीन धार्मिक वास्तूंशी संबंधित साहित्य, हे स्पष्ट होणार आहे. मात्र, ५०० वर्षे जुन्या शिवमंदिराशी निगडित हे रहस्य संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे.