चिखली ता. ५ : चिखली येथील पिंगळे रोड गट नंबर ११९३/७ ही जागा वाहनतळासाठी आरक्षित आहे. मात्र, त्याचा विकास न करता महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून तेथील मोकळ्या जागेत कचरा, हातगाड्या,राडारोडा, फ्लेक्स टाकले जात आहेत. या जागेवर रोज सरावाला येणाऱ्या खेळाडूंनाही मनाई केली जात आहे.
वाहनतळासाठी आरक्षित असलेल्या या मोकळ्या जागेत अनेक कबड्डीपटू, खेळाडू दररोज सराव करत होते. मात्र, महापालिकेचे कर्मचारी त्यांना आत येण्यास मनाई करत आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात फ्लेक्स, हातगाड्या तसेच इतर कचरा टाकून परिसरात महापालिकेने घाण केली आहे. सार्वजनिक वापरासाठी आरक्षित जागा अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे कचऱ्याचे डेपो बनविण्याचा महापालिकेला अधिकार नसल्याचे नगरसेवक विकास साने यांचे म्हणणे आहे. या जागेवरील कचरा त्वरित हटवावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला असून याबाबत ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाला पत्राद्वारे कळविले आहे.
ही जागा वाहनतळासाठीच राखीव आहे. मात्र तात्पुरत्या स्वरूपात भूमी जिंदगी विभागाकडून ती क्षेत्रीय कार्यालयाला वापरण्यासाठी मिळाली आहे. या जागेमध्ये कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेले समान ठेवले जात आहे. जेणेकरून हे सामान सुरक्षित राहील. ते दंड आकारुन पुन्हा परत केले जाणार आहे.
- अतुल पाटील, क्षेत्रीय अधिकारी, ‘फ’ कार्यालय