बेल्हे, ता. ६ : बेल्हे (ता. जुन्नर) येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रोत्सवानिमित्त तसेच मंदिर कलशारोहण द्वितीय वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त, ग्रामस्थांच्या वतीने ३ ते १० फेब्रुवारीदरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, बुधवारी (ता. ११) व गुरुवारी (ता. १२) दोन दिवस बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
बेल्हे येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वै. कोंडाजीबाबा डेरे यांच्या आशिर्वादाने व पांडुरंगमहाराज घुले, तुळशिराम महाराज सरकटे यांच्या प्रेरणेने, गेली जवळपास २५ वर्षे दरवर्षी यात्रोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन केले जात आहे.
त्यानिमित्त दररोज ज्ञानेश्वरी पारायण, गाथाभजन, हरिपाठ व सायंकाळी हरिकीर्तनानंतर दानशूर अन्नदात्यांकडून महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या अखंड हरिनाम सप्ताहकाळात डॉ. नारायण महाराज जाधव, वैभव महाराज शिंदे, नवनाथ महाराज माशेरे, ज्ञानेश्वर महाराज कदम (मोठे माऊली), ॲड. कृष्णा महाराज चवरे, डॉ. जगदीश महाराज जोशी, सचिन महाराज ढोले यांची हरिकिर्तने तसेच पांडुरंगमहाराज घुले यांच्या (ता. १०) काल्याच्या कीर्तनाने अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.