आमदारकीच्या पहिल्या निवडणुकीत पराभव ते मंत्री-प्रदेशाध्यक्ष; सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे इतके महत्त्वाचे नेते कसे बनले?
BBC Marathi February 06, 2026 09:47 PM
Sunil Tatkare/FACEBOOK

अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात एक नाव चर्चेत आलंय, ते म्हणजे सुनील तटकरे यांचं.

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली, तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची खरी सुत्रे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडूनच हलवली जात आहेत, असा कयास बांधून या दोघांवर टीकाही होते आहे.

सुनील तटकरे हे सध्या रायगड लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

काँग्रेस पक्षातून राजकीय प्रवासाला सुरुवात करत 1995 पासून आमदार, मंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशी विविध पदे भूषवणाऱ्या सुनील तटकरेंचा आजवरचा राजकीय प्रवास कसा राहिलाय, ते जाणून घेऊयात.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याआधीपासूनच सुनील तटकरे यांचं पक्षातील स्थान महत्त्वाचे मानले जात होते. शरद पवार यांनी स्वतः त्यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती.

मात्र, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तिथेही ते प्रदेशाध्यक्ष झाले.

रायगड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात जन्मलेले सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इतके महत्त्वाचे कसे बनले आणि ते महत्त्वाचे का मानले जातात?

सुनील तटकरे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी

सुनील तटकरे यांचा जन्म 10 जुलै 1955 रोजी रायगड जिल्ह्यातील कोलाड येथील सुतारवाडी येथे झाला. त्यांचे वडील दत्तात्रय तटकरे आणि आई गीता तटकरे. ते या कुटुंबातील धाकटे सुपुत्र आहेत. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घरातच त्यांचे बालपण गेले.

दत्तात्रय तटकरे हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. त्यांनी सरपंचपदापासून ते रायगड जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदापर्यंत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या.

Facebook/Sunil Tatkare

काँग्रेसमधील वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, बॅ. ए. आर. अंतुले आणि शरद पवार या नेत्यांशी दत्तात्रय तटकरे यांची जवळीक होती. त्यामुळे सुनील तटकरे यांना लहानपणापासूनच राजकारणाचे धडे घरातून मिळाले.

सुनील तटकरे यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून इंटर सायन्सपर्यंत शिक्षण घेतले. शिक्षणानंतर ते सरकारी रस्ते कंत्राटदार म्हणून काम करत होते. वडिलांच्या निधनानंतर ते सक्रिय राजकारणात उतरले.

त्यांचा विवाह 1981 मध्ये झाला असून त्यांच्या पत्नीचे नाव वरदा तटकरे आहे. या दाम्पत्यास आदिती आणि अनिकेत ही दोन मुले आहेत. दोघेही राजकारणात सक्रिय आहेत.

आदिती तटकरे या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार असून त्या महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होत्या. तसेच सध्याच्या महायुती सरकारमध्येही कॅबिनेट मंत्री आहेत.

अनिकेत तटकरे हे विधान परिषदेचे सदस्य होते. सुनील तटकरे यांचे भाऊ अनिल तटकरे आणि पुतण्या अवधूत तटकरे हेही राजकारणात सक्रिय असून दोघेही माजी आमदार आहेत.

अवधूत तटकरे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी सोडून आधी शिवसेनेत आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

1984 पासून आजपर्यंत जवळपास 4 दशकांहून अधिक काळ रायगड जिल्ह्याच्या राजकारणात तटकरे कुटुंबीय सक्रिय आहेत.

युवक काँग्रेस ते राष्ट्रवादी काँग्रेस

सुनील तटकरे यांनी वडिलांसोबत गावोगावी दौरे केले. त्यांनी वडिलांच्या गाडीचे चालक म्हणूनही काम केले. यातून त्यांचा जनसंपर्क वाढला.

कॉलेजच्या जीवनातच त्यांनी युवक काँग्रेसचे काम सुरू केले. 1984 मध्ये दत्तात्रय तटकरे यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर सुनील तटकरे रायगड जिल्ह्याच्या राजकारणात अधिक सक्रिय झाले.

ते 1984 पासून काँग्रेसमध्ये कार्यरत होते. सुरुवातीला काँग्रेस तालुका सरचिटणीस आणि रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.

1985 मध्ये त्यांनी माणगाव मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

त्यानंतर त्यांनी पक्ष संघटनेच्या कामावर लक्ष केंद्रित केले. 1995 मध्ये त्यांनी पुन्हा माणगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि काँग्रेसच्या तिकिटावर ते आमदार म्हणून निवडून आले.

त्या काळात राज्यात शिवसेना-भाजपची लाट असतानाही कोकणात काँग्रेसची एकमेव जागा सुनील तटकरे यांनी जिंकली होती.

शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी सुनील तटकरे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. 1999 आणि 2004 मध्ये ते माणगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झाले.

दत्तात्रय तटकरे हे शरद पवार आणि बॅ. ए. आर. अंतुले यांचे निकटवर्तीय मानले जात. हीच राजकीय निष्ठा सुनील तटकरे यांनीही कायम ठेवली.

राष्ट्रवादीतील फूट आणि अजित पवारांची साथ

2004 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार स्थापन झाल्यानंतर सुनील तटकरे यांना अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्रीपद देण्यात आले. 2008 मध्ये ते राज्याचे ऊर्जामंत्री झाले.

2009 मध्ये त्यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विजय मिळवला. त्यानंतर त्यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली.

Facebook/Sunil Tatkare

2014 मध्ये राष्ट्रवादीने त्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवले. मोदी लाट असताना रायगड मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्याकडून त्यांचा केवळ अडीच हजार मतांनी पराभव झाला.

त्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. 2014 मध्ये एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी त्यांची नियुक्ती केली.

2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी अनंत गीते यांचा पराभव करून रायगडमधून खासदारकी मिळवली.

2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.

70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात नाव

सुनील तटकरे यांच्यावर रायगड जिल्ह्यातील कोंडाणे येथे उल्हास नदीवर धरण बांधण्यासाठी 2011 मध्ये काढलेल्या निविदांबाबत आरोप झाले होते.

अटी-शर्ती शिथिल करून बोगस निविदादार उभे करण्यात आले आणि सुमारे 80 कोटी रुपयांचे काम 614 कोटी रुपयांपर्यंत फुगवले गेल्याचा आरोप करण्यात आला होता.

या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांनी तत्कालीन आघाडी सरकारवर टीका केली होती. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सिंचन प्रकल्पांमध्ये घोटाळे झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

जनमंच या स्वयंसेवी संस्थेने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता.

राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, 2001 ते 2012 या कालावधीत सुमारे 70 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले.

मात्र, या खर्चातून राज्यातील सिंचन क्षेत्रात केवळ 0.1 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले होते. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीही स्थापन करण्यात आली होती.

पक्षातील स्थान कसे वाढले?

राजकीय, मंत्रालयीन आणि विधिमंडळाचे वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख यांच्या मते, "सुनील तटकरे यांचे राज्यातील राजकीय वजन 1999 नंतर वाढले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर त्यांना संधी मिळाली. राष्ट्रवादीत गेल्यानंतर अजित पवार यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध निर्माण झाले आणि ते त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जाऊ लागले."

"रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीला मजबूत करायचे असल्याने सुरुवातीचा विरोध झुगारून त्यांना मंत्रीपद देण्यात आले. पुढील काळात वेगवेगळ्या सरकारमध्ये त्यांना महत्त्वाची जबाबदारी मिळत गेली."

"शरद पवार आणि अजित पवार या दोघांचेही ते विश्वासू सहकारी राहिले. त्यामुळे पक्षफुटीनंतरही त्यांचे स्थान अबाधित राहिले. महाविकास आघाडी सरकारनंतर भाजपसोबत सत्ता स्थापन झाल्यावर त्यांच्या प्रभावामुळे त्यांच्या मुलीला मंत्रीपद मिळाल्याचेही दिसून आले," असं निरिक्षण देशमुख यांनी नोंदवलं.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी त्यांनी सातत्याने आग्रह धरला. अधिक आमदार असूनही हे पद शिवसेनेला न मिळणे, हे त्यांच्या राजकीय वजनाचे उदाहरण आहे, असे देशमुख यांनी सांगितले.

Facebook/Sunil Tatkare

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश त्रिवेदी यांनीही सुनील तटकरे यांच्या राजकीय प्रवासाचा आढवा घेतला.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "सुनील तटकरे यांचा राजकीय आलेख कायम चढता राहिला आहे. काँग्रेसमध्ये ए. आर. अंतुले, विलासराव देशमुख, शरद पवार यांचे शिष्य म्हणून राजकारण करत स्थानिक पातळीपासून ते इथवर पोहोचले आहेत."

"काँग्रेसमधून बाहेर शरद पवारांच्या राजकीय दिशेवर विश्वास ठेवत त्यांचा राजकीय उदय झाला. पवारांसोबत जाण्याचा निर्णय हा भावनिक निष्ठेपेक्षा राजकीय वास्तव आणि भविष्यातील ताकद ओळखून त्यांनी घेतलेला होता. काँग्रेसमधून तटकरे थेट पवारांच्या प्रभावकेंद्रात आले. त्याचा त्यांना पुढील आयुष्यात खूप फायदा झाला, हे आजवरच्या त्यांच्या कारकीर्दीतून दिसतं."

"पुढे पक्षात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली तटकरे हे केवळ कोकणापुरते मर्यादित राहिले नाहीत. पक्षसंघटना, निवडणूक व्यवस्थापन आणि संकटाच्या काळात पक्षासोबत ठाम उभे राहणारे नेते म्हणून त्यांची ओळख तयार झाली."

"त्यामुळेच सुनील तटकरे यांचे पक्षातील स्थान आणि पक्षातील पक्षश्रेष्ठींबरोबरचे संबंध हळूहळू पण सातत्याने मजबूत होत गेले. त्यांना मंत्रीपदे, संसदीय भूमिका आणि संघटनात्मक जबाबदाऱ्या मिळाल्या कारण पवारांशी असलेली दीर्घकालीन निष्ठा आणि उपयुक्तता," असं मत त्रिवेदी यांनी व्यक्त केलं.

Facebook/Sunil Tatkare

त्रिवेदी पुढे सांगतात, "पक्ष स्थापनेपासून अजित पवार यांच्याशी देखील तटकरे यांचे संबंध कायम चांगले होते. अजित पवार राष्ट्रवादीत प्रभावी असताना सुनील तटकरे हे पवारांच्या राजकारणातील दुसऱ्या फळीतील महत्त्वाचे आधारस्तंभ होते. निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी अजित पवार असतानाही तटकरे यांची भूमिका संघटन सांभाळणारी आणि प्रादेशिक ताकद टिकवणारी होती."

"त्यामुळेच 2014 ला शरद पवारांच्या नेतृत्वातील एकत्रित राष्ट्रवादीचे ते प्रदेशाध्यक्ष देखील बनवले होते. तसेच अजित पवार वेगळ्या वाटेवर गेल्यानंतर पक्षात निर्माण झालेल्या पोकळीत तटकरेंचे महत्त्व लक्षणीयरीत्या वाढले. कारण राजकारणातील कार्यक्षमता, प्रभाव, पक्षावरील पकड आणि शरद पवार कुटुंबाशी असलेली दीर्घकालीन निष्ठा यामुळे ते राष्ट्रवादीतील अपरिहार्य नेते ठरले. त्यामुळे अजित पवारांनी देखील राज्यातील पक्षाची धुरा त्यांच्या हाती सोपवली."

"आज आरोप प्रत्यारोप टीका होत असली, तरी तटकरे यांचे राजकीय वजन हे केवळ पदांपुरते मर्यादित नाही. तर सर्वांशी चांगले राजकीय संबंध, पक्ष टिकवणे, संघटना बांधणे आणि अनुभव या निकषांवर त्यांचे महत्त्व ठरते. त्यामुळे अजित पवार असताना ते उपयुक्त आणि ते नसताना आता पक्षात आवश्यक, अशी तटकरेंची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्पष्टपणे दिसते," असं मत त्रिवेदी व्यक्त करतात.

हेलिपॅड प्रकरण

जलसिंचन घोटाळ्याच्या आरोपांनंतर काही महिन्यांपूर्वी हेलिपॅड प्रकरणावरूनही त्यांच्यावर टीका झाली. 12 एप्रिल 2025 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावरील कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे होते.

Facebook/Sunil Tatkare

या दौऱ्यादरम्यान अमित शहा हे सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनासाठी हेलिकॉप्टरने गेले. यासाठी उभारण्यात आलेल्या हेलिपॅडवर सुमारे 1 कोटी 39 लाख 115 रुपये खर्च झाल्याचा आरोप करण्यात आला. यावरून विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले.

या प्रकरणावर सुनील तटकरे यांनी फारसे भाष्य केले नाही. मात्र प्रोटोकॉल आणि सुरक्षेच्या कारणास्तव ही व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते.

या संपूर्ण प्रवासातून सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक प्रभावी आणि महत्त्वाचे नेते म्हणून पुढे आले आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

  • अजित पवारांच्या अकाली निधनानंतर 'पवारांचा' सत्तासंघर्ष कसा असेल?
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची खरंच शक्यता आहे का?
  • नरेश अरोरा कोण आहेत, जे महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक चर्चेत आले?
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.