येऊ शकत नसाल तर… रातोरात लग्नपत्रिका व्हायरल, असं काय लिहिलंय त्यात? गल्लीपासून दिल्लीपर्यंत का होतेय चर्चा?
Tv9 Marathi February 06, 2026 08:45 PM

लग्न म्हणजे एक मोठा उत्सवच असतो. घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं. लग्नाला बहुतेक पाहुणे हजेरी लावतातच लावतात. नेत्रदीपक असं डेकोरेशन आणि संगिताचे सूर अशा थाटात विवाह पार पडतो. पण उत्तर प्रदेशातील बागपतमधील एक विवाह सोहळा भलताच लक्षवेधी ठरला आहे. या लग्नाची लग्नपत्रिका रातोरात व्हायरल झाली आहे. एकाच कुटुंबात दोन लग्न आहेत. मुलीचं आणि मुलाचं लग्न एक दिवस आड होणार आहे. त्यामुळे मुलगा आकाशने हटके लग्नपत्रिका छापली आहे. त्यामुळे या लग्नपत्रिकेची जोरदार चर्चा होत आहे.

आकाश आणि त्याच्या बहिणीचं लग्न होणार आहे. त्याच्या बहिणीला दुसऱ्या गावात दिलंय. तर आकाशही बाजूच्याच गावातील मुलीशी लग्न करणार आहे. दोन्ही लग्न एकाच वेळी करण्याचं कुटुंबाने ठरवल्यानंतर नवरदेव असलेल्या आकाशने हटके लग्नपत्रिका छापली आहे. त्यावर त्याने प्रतिक्रियाही दिलीय. नातेवाईक लांबून येणार आहेत. त्यांना आधी लग्नपत्रिका देऊन लग्नाचं आमंत्रण द्यावं लागतं. पण अनेकदा लग्नपत्रिका देत असताना लग्नाच्या काळात अपघात होतात. त्यामुळेच मी QR कोड असलेलं कार्ड छापलं आहे. म्हणजे काही कारणाने नातेवाईकांना येता आलं नाही तर QR कोड स्कॅन करून आहेर पाठवू शकतात. घर बसल्या नातेवाईकांना आहेर देता यावा, यासाठी ही शक्कल लढवली आहे. त्यामुळे होणारा खर्चही बचत होणार आहे, असं आकाशने सांगितलं.

7 आणि 8 फेब्रुवारी रोजी लग्न

आकाश वाल्मिकी हा दोघट येथील रहिवाशी आहे. त्याने त्याच्या आणि बहिणीच्या लग्नपत्रिकेवर QR छापला आहे. येत्या 7 तारखेला त्याच्या बहिणीचं लग्न आहे. तर 8 तारखेला त्याचं लग्न आहे. दोन्ही लग्नाच्या लग्नपत्रिकेवर QR कोड छापून त्याने नातेवाईकांची होणारी गैरसोय टाळली आहे. दोघांनाही ऑनलाईनच कन्यादान आणि आहेरही पाठवता यावा म्हणून ही सोय करण्यात आली आहे. लग्न म्हटल्यावर नातेवाईक मंडळी दुरुन दुरून येत असतात. त्यांना लांबचा प्रवास करावा लागतो. त्यावेळी अनेकदा रस्ते अपघात होतात. त्याचा परिणाम सनई चौघडे वाजण्याच्या ठिकाणी मातम होतं. हे सर्व टाळण्यासाठीच आम्ही हा निर्णय घेतला आहे. नातेवाईकांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे, असं त्याने सांगितलं.

रातोरात व्हायरल

आकाश आणि त्याच्या बहिणीची ही लग्नपत्रिका रातोरात व्हायरल झाली आहे. त्यामुळे दोघेही प्रसिद्ध पावले असून दोघांची सोशल मीडियात चर्चा होत आहे. खासकरून लोक या नव्या युक्तीचं कौतुक करत आहेत. अवाढव्य खर्च, लांबचा प्रवास टाळण्यासाठी आणि पैसे योग्य हातातच जाण्यासाठीची ही युक्ती अप्रतिम असल्याचं लोक म्हणत आहेत. आकाशने या लग्नपत्रिका उत्तर प्रदेशातील तसेच पंजाब, चंदीगड, पानीपत येथील नातेवाईकांनाही व्हॉट्सअपवरून पाठवल्या आहेत. तुम्हाला येणं शक्य नसेल तर या QR कोडवरून आहेर पाठवा, असा प्रेमळ मेसेजही त्याने पाठवला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.