Nashik Municipal Corporation : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मनपा ॲक्शन मोडमध्ये; अस्वच्छता करणाऱ्यांना इशारा
esakal February 09, 2026 03:45 AM

जुने नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि नदी स्वच्छता अभियानाच्या पार्श्वभूमीवर, महापालिका अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांनी शुक्रवारी (ता. ६) भारतनगर परिसराचा दौरा केला. सुमारे दीड तास चाललेल्या या दौऱ्यात त्यांनी स्वतः गल्लीबोळांत जाऊन स्वच्छतेची पाहणी केली आणि रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

या दौऱ्यात नायर यांनी परिसरातील घनकचरा व्यवस्थापनाचा आढावा घेतला. नियमित घंटागाडी येते का, कर्मचारी स्वच्छता करतात का, याची विचारपूस त्यांनी नागरिकांकडे केली. यावेळी अनेक रहिवाशांनी सांगितले, की रात्री उशिरा कामावरून आल्यामुळे सकाळी घंटागाडी येते तेव्हा उठायला उशीर होतो. या तांत्रिक अडचणीमुळे काही वेळा कचरा इतरत्र फेकला जातो, अशी कबुलीही नागरिकांनी दिली.

यावर आयुक्तांनी नदीत कचरा न टाकण्याचे आवाहन करत, गल्लीबोळात येणाऱ्या ढकलगाड्यांमध्येच कचरा टाकण्याचे महत्त्व पटवून दिले. येत्या १८ किंवा १९ तारखेपासून सुरू होणाऱ्या पवित्र रमजान महिन्यासाठी महापालिकेने विशेष नियोजन केले आहे. रोजा इफ्तारीनंतर मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत असतो. ही बाब लक्षात घेऊन महिनाभर दररोज सायंकाळी ढकलगाड्यांच्या माध्यमातून विशेष कचरा संकलन मोहीम राबवण्यात येईल, जेणेकरून परिसरात अस्वच्छता पसरणार नाही.

पुढील आठवड्यात नंदिनी नदी आणि परिसरात ‘डीप क्लिनिंग’ मोहीम राबवून साचलेला सर्व कचरा पूर्णपणे काढला जाईल. भारतनगरमधील रस्ते अरुंद असल्याने मोठ्या घंटागाड्या सर्वत्र जाऊ शकत नाहीत. यासाठी नंदिनी नदी पूल ते इंदिरानगर मार्गावर ‘कलेक्शन सेंटर’ उभारले जाणार आहे.

Mahadevrao Mahadik : आप्पा महाडिक पुन्हा महापालिका राजकारणात! महापौर रुपाराणी निकम यांनी घेतली भेट, अनेक किस्सांची आठवण

ढकलगाड्यांमधील कचरा येथे गोण्यांमध्ये जमा केला जाईल आणि तेथून घंटागाडीद्वारे त्याची विल्हेवाट लावली जाईल. या दौऱ्याप्रसंगी उपायुक्त विवेक निकत, विभागीय स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाट आणि घनकचरा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्तांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.