जळगाव: जिल्ह्यात हिवाळा संपताच उष्णतेचा पारा चढू लागला आहे. ऋतू बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसून येत आहे. मागील काही दिवसांत कमाल तापमानात सातत्याने वाढ होत आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवत आहे. त्याचबरोबर सकाळी व रात्री तापमानात गारवा राहिल्याने दिवस-रात्रीच्या तापमानातील फरक वाढला. या बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, त्वचेच्या व पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी वाढल्या.
दहावी व बारावीच्या महत्त्वाच्या परीक्षा तोंडावर असून, विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचा ताण, मानसिक दडपण आणि बदलते हवामान याचा परिणाम दिसून येत आहे. परीक्षेच्या काळात योग्य नियोजन, आरोग्याची काळजी आणि सकारात्मक मानसिकता ठेवणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
चुकीच्या सवयी, अपुरी झोप आणि अनियमित आहारामुळे अभ्यासावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. अचानक वाढलेली उष्णता आणि कोरडे हवामान याचा विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, आधीपासून आजार असलेल्या व्यक्तींवर अधिक परिणाम होत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.
शहरातील विविध रुग्णालये व दवाखान्यांमध्ये ताप, घशाचे विकार, पाणी कमी होणे (डिहायड्रेशन), उष्णतेमुळे होणारा थकवा अशा तक्रारींसाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, पुरेसे पाणी न पिणे, उन्हात अधिक वेळ राहणे आणि ऋतू बदलानुसार आहार व दिनचर्या न बदलणे ही यामागील प्रमुख कारणे आहेत.
गेल्या सात दिवसांत शहरात कमाल २५ ते २८ अंश सेल्सिअस, तर किमान १४ ते १७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. पुढील काही दिवसांत कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे, तर किमान तापमानही हळूहळू वाढण्याचा अंदाज आहे. दरम्यान, आरोग्यतज्ज्ञांनी नागरिकांना दुपारच्या कडाक्याच्या उन्हात बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
विद्यार्थ्यांनी अधिक काळजी घ्यावी
विद्यार्थ्यांनी योग्य वेळापत्रकाद्वारे अभ्यास करावा. उरलेल्या अभ्यासाचा ताण न घेता पुनरावृत्तीवर भर द्यावा. सतत रात्री उशिरापर्यंत जागरण टाळून किमान सात ते आठ तासांची पुरेशी झोप घ्यावी, जेणेकरून एकाग्रता टिकून राहील.
मोबाईल, सोशल मीडियाचा अतिवापर टाळावा. मानसिक तणाव कमी करण्यासाठी दररोज थोडा वेळ योग, ध्यान, प्राणायाम किंवा हलका व्यायाम करावा. परीक्षेची भीती मनात न ठेवता आत्मविश्वासाने तयारी करावी. पालकांनीही विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव न आणता त्यांना मानसिक आधार द्यावा, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
Forest Department: येलदरी स्मृतीवनाची गेली रया! कोट्यवधींचा प्रकल्प धुळीस; वनविभागाचे दुर्लक्षबदलत्या हवामानामुळे सर्दी, ताप, डोकेदुखी, थकवा यांसारख्या तक्रारी वाढत असल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष न करता संतुलित व पौष्टिक आहार घ्यावा. भरपूर पाणी पिणे, फळे, हिरव्या भाज्या, घरगुती व हलका आहार यांचा समावेश करावा. जंक फूड, बाहेरील तेलकट पदार्थ टाळावेत.
- डॉ. स्वप्नील सांगळे, जिल्हा चिकित्सक