Marathi Entertainment News : व्हॅलेंटाईन डे अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे यानिमित्ताने जाणून घेऊया एक सुंदर प्रेमकथा अशा अभिनेत्रीची जिच्या आई-वडिलांनी अजूनही तिच्या लग्नाला, नवऱ्याला पूर्णपणे स्वीकारलं नाहीये. ही अभिनेत्री आहे मैंने प्यार किया फेम भाग्यश्री उर्फ भाग्यश्री पटवर्धन.
भाग्यश्रीने 1989 मध्ये हिमालय दसानी यांच्याशी लग्न केलं. त्यांचं लव्हमॅरेज होतं. पण त्यांच्या लग्नाला भाग्यश्री यांच्या घरातून खूप विरोध होता. आई-वडिलांची परवानगी नसताना घरातून बाहेर पडून त्यांनी लग्न केलं. कशी आहे त्यांची लव्हस्टोरी जाणून घेऊया.
हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की,"आम्ही एकाच शाळेत होतो. त्याचदरम्यान आम्ही प्रेमात पडलो. त्याने प्रपोज केल्यावर मी लगेच माझ्या आई-वडिलांना सांगितलं पण ते नाराज झाले. त्यामुळे मी त्याला नकार दिला. त्यानंतर आम्ही अजिबात संपर्कात नव्हतो. तो परदेशात गेला, तिकडे शिक्षण घेतलं. पुढे एकदा आम्ही कॉफी डेटवर भेटलो आणि पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडलो. "
"त्यानंतर पुन्हा माझ्या पालकांना याविषयी कळलं. माझ्या आई-वडिलांनी म्हटलं जोपर्यंत तुम्ही दोघं खऱ्या जगाचा अनुभव घेत नाहीस. इतर मुलांना भेटत नाहीस तोपर्यंत लग्नासारखं मोठं पाऊल उचलणं शहाणपणाचं नाही. तू आता खूप लहान आहेस. त्यामुळे तू त्याच्याशी अतिशय वाईट पद्धतीने ब्रेकअप कर. मी तसं केले. मी माझ्या आई-वडिलांना सांगितलं होतं की मी एक वर्षं तुम्ही जे म्हणाल ते ऐकेन. या काळात जर तुम्ही माझं लग्न ठरवलं, लग्न झालं तर त्यासाठीही मी तयार होईन आणि ते लग्न निभावेन."
"हिमालयाशी ब्रेकअप केल्याचा मला खूप त्रास झाला पण मी त्याच्यावर खूप प्रेम करते हे मला पालकांसमोर सिद्ध करायचं होतं. त्यानंतर माझ्या पालकांनी माझ्यासमोर हिमालयने मला लिहिलेली सगळी पत्रं जाळून टाकली. त्यानंतर मी रात्रभर रडत होते."
पण हिमालय आणि भाग्यश्रीचं प्रेम जिंकलं आणि त्यांनी मंदिरात लग्न करायचं ठरवलं. "आमचं नातं आई-वडिलांच्या आशिर्वादाशिवाय पुढे जावं अशी आमची इच्छा नव्हती. पण माझ्याकडे पर्याय नव्हता. मी त्यांचे आशीर्वाद मागितले पण त्यांनी दिले नाहीत. मी पाया पडले आणि घर सोडून गेले. "
"लग्नानंतरही मी आशीर्वाद घ्यायला घरी गेले. पण त्यांनी दार उघडलं नाही. काही वर्षांनी माझ्या मुलाचा जन्म झाला मग त्यांनी हे नातं थोडं स्वीकारलं. त्यांनी अजूनही पूर्णपणे स्वीकारलेलं नाही. ती वेदना, खंत नेहमीच माझ्या मनात राहील.'
"माझ्या लग्नानंतर छोटासा स्वागत समारंभ करण्यात आला. यावेळी सूरजजींचे वडील, सूरजजी, त्यांची पत्नी, सलमान सगळे होते. सलमान खूप काळजीत होता. तो सतत मी ठीक आहे का ? विचारत होता. सलमान सर तर माझ्या आई-वडिलांशी बोलून हा वाद दूर करण्यासाठीही तयार होते. सलमान सगळ्यात शेवटी गेला. तो त्या दिवशी खूप गंभीर होता."
Video : 'या' अत्यंत पवित्र ठिकाणी विशाल-अक्षयाने बांधली लग्नगाठ ! चाहत्यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव