नामपूर (जि. नाशिक): शेतमालाला मिळणारा अत्यल्प बाजारभाव, कर्जबाजारीपणा, नापिकी, बाजार समित्यांतील लूट, रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, तसेच अस्मानी-सुलतानी संकटांच्या मालिकेमुळे राज्यातील शेतकरी गंभीर आर्थिक व मानसिक दडपणाखाली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात रोज सरासरी ७ ते ८ शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. गेल्या चार दशकांपासून लागलेला हा कलंक अद्याप पुसला गेलेला नसल्याने कृषी विभागाने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष कृतिदल (टास्क फोर्स) स्थापण्याचा निर्णय घेतला आहे.
कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी या विशेष कृतिदलाची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यासह सामाजिक, आर्थिक आणि हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या संकटांवर चतुःसूत्री दृष्टिकोनातून उपाययोजना राबविण्याचा या दलाचा उद्देश आहे. अशा प्रकारचे स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरल्याचे सांगितले जात असले, तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा विविध शेतकरी संघटना व सामाजिक संस्थांनी व्यक्त केली आहे.
एकात्मिक उपाययोजनांवर भर
राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध योजना राबवल्या जात असल्या तरी हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्ती, पिकांचे नुकसान, सामाजिक ताणतणाव आणि मानसिक अस्थैर्य या समस्या तीव्र होत आहेत. त्यामुळे आत्महत्येच्या मुळ कारणांचा अभ्यास करून आपत्तिपूर्व, आपत्तीच्या काळात आणि आपत्तीनंतर शेतकऱ्यांना शेती, आर्थिक, सामाजिक व मानसिक आधार देण्याची समन्वित प्रणाली विकसित करण्याचा कृतिदलाचा मानस आहे.
या अभियानांतर्गत आत्महत्येस कारणीभूत घटकांचा अभ्यास व संशोधन, हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम आणि उपाय, मानसिक आरोग्यावर आधारित मार्गदर्शन व समुपदेशन, आर्थिक साहाय्य व तांत्रिक सक्षमीकरण, पुनर्वसनासाठी विशेष कृती आराखडा, विभागीय व जिल्हास्तरावर अंमलबजावणीची यंत्रणा यांसारख्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
दररोज ८ शेतकऱ्यांचा मृत्यू!
गेल्या पाच वर्षांत राज्यात दररोज सरासरी ८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची शासकीय नोंद आहे. मार्च २०२५ मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही कबुली देण्यात आली. २०२४ मध्ये अमरावती विभागात १,०६९ तर छत्रपती संभाजीनगर विभागात ९५२ आत्महत्या झाल्या आहेत.
तज्ज्ञांचा सहभाग
विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक रफिक नाईकवाडी हे कृतिदलाचे अध्यक्ष असतील. सुनील बोरकर, उदय देशमुख, गणेश घोरपडे, जीवन बुंदे, नंदकिशोर नाईनवाड, सत्यजित शितोळे, सोनाली शिळकर यांचा समावेश दलात आहे. तसेच ‘शिवार फाउंडेशन’च्या माध्यमातून कार्यरत कृषी समाजशास्त्रज्ञ डॉ. विनायक हेगाणा आणि महिला शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर संशोधन करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञ सृष्टी डोईजड यांची विशेष सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Kolhapur Nurseries : औषधींचा राजा धोक्यात? कोल्हापुरात कडुलिंब रोपांचा गंभीर तुटवडाशेतकरी आत्महत्या हा केवळ नुकसानभरपाईचा विषय नाही. शेतकऱ्याला आर्थिक, तांत्रिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करणे महत्त्वाचे आहे. कृषी विभागातील सर्व योजना इतर विभागांशी जोडून उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे हा कृतीदलाचा मुख्य उद्देश आहे.
- सूरज मांढरे, कृषी आयुक्त
शून्य आत्महत्येची नोंद असलेली राज्ये/केंद्रशासित प्रदेश
पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, झारखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, चंदीगड, दिल्ली, लक्षद्वीप