Sanjay Raut on Ajit Pawar Plane crash : अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास होणार नाही, कोणाचा हात ते… संजय राऊत यांचा धक्कादायक दावा
Tv9 Marathi February 14, 2026 03:45 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात (Ajit Pawar Plane crash) होऊन 15 दिवस उलटले आहेत. अजित दादांचे अकाली निधन झाल्यानंतर राज्यातील वातावरण शोकाकूल आहे. पण हा विमान अपघात होता की घातपात यावरून सध्या संशयाचं रान उठलं आहे. शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले असून याप्रकरणाची सखोल, कसून, निष्पक्ष चौकशी व्हायला हवी अशी मागणी केली आहे. त्यांच्यासह शरद पवार गटाचे नेते तसेच अजित पवार यांच्या पक्षातीलल अनेक कार्यकर्ते, नेत्यांनीही दादाच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी अशी वारंवार मागणी केली आहे. यंत्रणा काम करत आहेत, तपास सुरू आहे इतकंच समोर आलंय. 15 दिवस होऊनही अजून काहीही निष्पन्न झालेलं नाही. यावरून प्रश्न विचारण्यात आला असता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे.

तपास होणार नाही

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास होणार नाही, तपासातून काहीही निष्कर्ष निघणार नाही असं संजय राऊत स्पष्टच म्हणाले. रोहित पवार यांनी जे प्रेझेंटेशन दिलं , त्यातल्या कोणत्या मुद्यावर झाला किंवा झाला नाही, हे शेवटपर्यंत तुम्हाला कळणार नाही. अजित पवार हे ज्या विमान कंपनीच्या (VSR Company) विमानातून प्रवास करत होते, त्या कंपनीतही एक अदृश्य हात आहे. त्या कंपनीमधली बेनामी इन्व्हेस्टमेंट, बेनामी मालक कोण याचा आधी तपास व्हायला पाहिजे, असे राऊत म्हणाले.

बारामतीजवळ विमान कोसळून अजित पवारांचा मृत्यू

28 जानेवारी रोजी काही सभांसाठी अजित पवार हे मुंबईहून बारामतीला निघाले होते. सकाळी 8.45 च्या सुमारास त्यांचं विमान बारामती एअरपोर्टजवळ आलं आणि खाली कोसळलं. मोठ्ठा स्फोट होऊन आग लागली. यामध्ये अजित पवार यांच्यासह आणखी चार जणा असे एकूण 5 लोकं मृत्यूमुखी पडले. यामुळे बारामतीसह अख्खा महाराष्ट्र शोकाकूल झाला.

या दुर्दैवी घटनेला 3 आठवडे होत आले असून या अपघाताभोवती संशयाचं धुकं गडद होताना दिसत आहे.  अजित दादांच्या अकाली जाण्यानंतर त्यांचे पुतणे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली. मुंबई व दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले असून काही शंकाही बोलून दाखवल्या.  यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.  आमदार अमोल मिटकरी, रूपाली ठोंबरे पाटील आणि सुरज चव्हाण हे सातत्याने या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करत आहेत.

मात्र 3 आठवड्यानंतरही कोणतीही ठोस माहिती अजून समोर आलेली नाही. त्यातच आता संजय राऊतांनी केलेल्या या विधानामुळे गोंधळ आणखीनच वाढला आहे. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.