नारायणगाव, ता. ४ : झेंडूच्या फुलांना मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने जुन्नर तालुक्यातील झेंडू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्याच्या बाजारभावात तोडणी मजुरी वसूल होत नसल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांची तोडणी थांबवली आहे. यामुळे एकरी सुमारे ७० हजार रुपयांचा केलेला भांडवली खर्च कसा वसूल होणार अशी चिंता उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत. मात्र, १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा दरम्यान दोन ते तीन दिवस बाजारभाव वाढतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
मागील वर्षी फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान झेंडूच्या फुलांना प्रतिकिलोग्रॅम ७० ते ८० रुपये बाजारभाव मिळाल्याने यावर्षी तालुक्यातील नारायणगाव, गुंजाळवाडी, सावरगाव, येणेरे,कुसूर, गोळेगाव, वडज, येडगाव भागातील बहुतेक शेतकऱ्यांनी मल्चिंग, ठिबक या आधुनिक तंत्राचा वापर करून गोल्डन, अंबर यलो(पिवळा), कलकत्ता ऑरेंज (भगवा) या संकरित जातीच्या झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. झेंडू उत्पादनासाठी मल्चिंग, ठिबक सिंचन, शेतीची मशागत, रोपे, रासायनिक खते, बुरशी व कीटकनाशके आदीसाठी एकरी सुमारे ७० हजार रुपयांचा भांडवली खर्च केला आहे. सद्यःस्थितीत तोडणी हंगाम सुरू झाल्याने पिवळ्या व भगव्या रंगाच्या फुलांनी बहरलेले झेंडूचे मळे लक्ष वेधून घेत आहेत. तोडणी हंगाम सुरू होताच मागील आठ दिवसापासून झेंडूच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. प्रतवारी व रंगानुसार झेंडूच्या फुलांना सध्या प्रतिकिलो नऊ ते १५ रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळत आहे. मुंबई येथील बाजारपेठेत फुले विक्री पाठवण्यासाठी कमिशन, मोटार भाडे, हमाली, जागा भाडे आदीसाठी प्रतिकिलो सुमारे आठ ते नऊ रुपये खर्च येत आहे. फुलांची तोडणी करण्यासाठी प्रतिकिलो पाच ते सहा रुपये खर्च येतो. काढणी मजुरी ते विक्री दरम्यान फुलांसाठी प्रतिकिलो १३ ते १५ रुपये खर्च येतो. त्यामुळे सध्याच्या बाजारभावात तोटा होत असल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी फुलांची तोडणी थांबवली आहे. सध्याच्या बाजारभावात भांडवली खर्च वसूल होणार नसल्याने जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
घड निर्मिती न झाल्याने जम्बो द्राक्षाची बाग तोडून पावणे दोन एकर क्षेत्रात झेंडूची लागवड केली आहे. सुमारे दीड लाख रुपये भांडवली खर्च झाला आहे. फुलांची तोडणी सुरू झाली आहे. मात्र सध्या मुंबई बाजारपेठेत दहा ते बारा रुपयांच्या दरम्यान प्रतिकिलो ग्राम भाव मिळत आहे. सध्याच्या बाजारभावात कमिशन, मोटार भाडे, हमाली, जागा भाडे आदीचा खर्च वजा जाता शिल्लक रकमेतून तोडणी मजुरी सुद्धा वसुल होत नाही. फुलांच्या हाराची किंमत पाहता व्यापारी शेतकऱ्यांच्या फुलांना कवडीमोल भाव देत आहेत.
- जितेंद्र भोर, फूल उत्पादक, ता. जुन्नर
07951, 07949