Ichalkaranji crime news : अपर पोलिस अधीक्षक कार्यालयातून पोलिसांसोबत बाहेर पडलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर आज भररस्त्यात रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडण्यात आली. गोळी उजव्या बरगडीत खोलवर घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ओंकार जितेंद्र कांबळे (वय २२, रा. समता चौक, सांगलीवाडी, जि. सांगली) असे जखमीचे नाव आहे. प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
हा प्रकार रात्री साडेसातच्या सुमारास सांगली रोडवरील बादशहा पेट्रोल पंपाजवळ घडला. संशयित हल्लेखोर अनुराग सूर्यवंशी (रा. इचलकरंजी) याच्यासह अन्य साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. शहरात गोळी झाडून हल्ला झाल्याचा प्रकार प्रथमच घडल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. तपासादरम्यान सांगली रोड काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. रात्री उशिरा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना तपासाबाबत सूचना दिल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः काही महिन्यांपूर्वी ओंकार कांबळे आणि संशयित अनुराग सूर्यवंशी यांच्यात प्रेम प्रकरणातून वाद निर्माण झाला होता. या वादातून मारहाण झाली होती. याप्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. ओंकार कांबळे व त्याच्या साथीदारांना अटकही करण्यात आली होती. नंतर ते जामिनावर बाहेर आले होते. या पार्श्वभूमीवर आज प्रतिबंधात्मक कारवाईसाठी ओंकार याला येथील अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलावण्यात आले होते.
दरम्यान, कार्यालयाबाहेर अनुराग सूर्यवंशी व त्याचे काही साथीदार हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती ओंकार याने पोलिसांना दिली होती. जयसिंगपूर पोलिस ठाण्याकडील पोलिस जगदीश पाटील यांना ओंकारसोबत जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. दुपारच्या सुमारास ओंकार पोलिसपाटील यांच्यासोबत दुचाकीवरून कार्यालयातून बाहेर पडला. ओंकार दुचाकी चालवत होता, तर पोलिस कर्मचारी पाठीमागे बसला होता. सांगलीरोडवरील बादशाह पेट्रोल पंपाजवळील एका पशुखाद्य दुकानासमोर ते पोहोचले असता मागून दुचाकीवर आलेल्या अनुराग सूर्यवंशीने अचानक जवळ येत रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. गोळी ओंकारच्या उजव्या बाजूच्या बरगडीत घुसली. अचानक झालेल्या गोळीबारामुळे ओंकार आणि पोलिसपाटील दोघेही दुचाकीसह खाली कोसळले.
Ichalkaranji Crime : गुन्हेगारी टोळ्यांची सोशल मीडियावर भाईगिरी; ‘भाई’,‘किंग’,‘साम्राज्य’,‘गँग’ नावांनी अकाउंटस्; एकमेकांना आव्हानगोळीबारानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिस कर्मचारी पाटील यांनी प्रसंगावधान राखत जखमी ओंकार याला जवळील पशुखाद्य दुकानात नेले आणि दुकानाचे शटर खाली ओढले. दरम्यान, हल्लेखोर अनुराग सूर्यवंशी दुचाकीवरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकही पोहोचले. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनामा सुरू होता. फॉरेन्सिक पथक, श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. तपासादरम्यान सांगली रोड काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.
गोळीबाराचा आवाज अन् भीतीचे सावट
गोळीबाराचा आवाज होताच परिसरातील नागरिक दचकले. सुरुवातीला टायर फुटल्याचा मोठा आवाज झाल्याचा समज करून अनेकजण आपल्या कामात गुंतले होते; मात्र काही क्षणांतच एक तरुण रक्तबंबाळ अवस्थेत कोसळल्याचे दिसताच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. घबराटीत लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. काहींनी दुकानांचे शटर खाली ओढले. मुख्य मार्गावर झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
‘रिप्लाय देणार’ची उघड धमकी
ओंकार कांबळे व त्याचे साथीदार कारागृहात गेल्यानंतर संशयित अनुराग सूर्यवंशी याने ‘रिप्लाय देणार’ असे उघड आव्हान दिल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यावेळी त्याने सोशल मीडियावरही आक्रमक स्वरातील स्टेटस ठेवून सूचक इशारे दिल्याचे समोर आले. ओंकार जामिनावर सुटून इचलकरंजीत आल्याची संधी साधून त्याच्यावर हल्ल्याचा कट रचण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे.