मुलुंडच्या एलबीएस रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा मृत्यू, काही जण जखमी
निलेश बुधावले, एबीपी माझा February 14, 2026 04:13 PM

मुंबई: मुंबईतील मुलुंड (पश्चिम) परिसरात आज शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान गंभीर अपघात घडला. एलबीएस रोड LBS Road वरील बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा एक भाग अचानक तुटून (Mumbai Accident Metro Slab Collapsed) खाली पडला. हा तुकडा रस्त्यावरून जात असलेल्या ऑटो रिक्षा आणि एका कारवर कोसळला. ही घटना जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ घडली. प्राथमिक माहितीनुसार, दुपारी सुमारे १२.२० वाजता या अपघाताची माहिती संबंधित यंत्रणांना मिळाली. या दुर्घटनेत ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.(Mumbai Accident Metro Slab Collapsed)

एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

या घटनेत जखमी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झालेलाल आहे, मात्र त्या मृत व्यक्तीबाबत कोणतीही इतर माहिती समोर आलेली नाही. या ठिकाणी काम सुरू असताना तेथे बँरीकेट लावलेले नव्हते, किंवा कोणत्याही इतर उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या, वाहतूक कोंडी होते म्हणून परिसरातील बँरीकेट हटवण्यात आले होते, त्यानंतर आज ही अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. त्या परिसरात काम सुरू असतानाच तेथे कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या, काम सुरू असताना स्लँब कोसळून ही घटना घडली आहे, यामध्ये चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर आता एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, मेट्रो प्राधिकरणाचे कर्मचारी, संबंधित विभागाचे कर्मचारी तसेच १०८ रुग्णवाहिका सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून बचावकार्य तत्काळ सुरू करण्यात आले. पोलीसांनी परिसर ताब्यात घेत वाहतूक वळवली आणि रस्त्यावर पडलेला मलबा हटवण्याचे काम हाती घेतले. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू असून बांधकामादरम्यान सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का, याचीही चौकशी केली जात आहे.(Mumbai Accident Metro Slab Collapsed)

मिळालेल्या माहितीनुसार मुलुंड येथील लाल बहादूर शास्त्री (LBS Road) मार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून मेट्रो मार्गिकेचे काम सुरु आहे. त्यासाठी याठिकाणी दररोज भलेमोठे गर्डर आणि स्लॅब वरती चढवण्याचे काम सुरु असते. आज शनिवारी मेट्रोचा एक स्लॅब खाली कोसळला. त्यावेळी खालच्या एलबीएस रोडवरुन वाहने ये-जा करत होती. हा स्लॅब एका ऑटो रिक्षावर आणि कारवर कोसळला आहे.  स्लॅबच्या खाली आलेल्या वाहनांच्या भागाचा चेंदामेंदा झाला आहे. हा स्लॅब कोसळला तेव्हा रिक्षातून तीन जण आणि ड्रायव्हर प्रवास करत होते. हे चार जण अपघातामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे.जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्लॅबच्या खाली दबून वाहनांचा झालेला चेंदामेंदा बघता जखमींपैकी काहीजण दगावल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बीएमसीने या घटनेबाबत माहिती देताना म्हटले आहे की, "आज दुपारी १२.२० वाजता मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस रोडवरील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळला. बांधकाम सुरू असताना सिमेंट मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळून रिक्षावर पडला. मुंबई अग्निशमन दल, पोलिस, मेट्रो कर्मचारी, वॉर्ड कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी उपस्थित आहेत. ऑटोरिक्षातील ३-४ जण जखमी झाल्याची शक्यता आहे. तपशीलांची प्रतीक्षा आहे."

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.