सेन्सेक्स 1200 अंकांनी कोसळला, निफ्टीत देखील घसरण, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान, प्रमुख कारणं जाणून घ्या...
जगदीश ढोले February 19, 2026 06:43 PM

मुंबई : भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स 1236 अंकांनी कोसळला तर, निफ्टीमध्ये देखील घसरण झाली. भारतीय शेअर बाजारात आज झालेल्या घसरणीमुळं बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 472 लाख कोटींवरुन 8 लाख कोटी रुपयांनी घसरुन 464 लाख कोटींवर आलं आहे. 

भारतीय शेअर बाजारात जोरदार विक्री करत गुंतवणूकदारांनी नफा कमावण्याचं धोरण स्वीकारल्याचं दिसून आलं. सेन्सेक्स 1236 अंकांच्या घसरणीसह 82498.14 वर बंद झाला. तर निफ्टी 50  मध्ये  365 अंकांची घसरण होऊन  निर्देशांक 25454.35 अंकांवर बंद झाला. 

शेअर बाजारात घसरण, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले

बीएसई 150 मिडकॅप निर्देशांक 1.54 टक्क्यांनी घसरला. तर, बीएसई 250 स्मॉलकॅप निर्देशांक 1.16 टक्क्यांनी घसरला.  शेअर बाजारातील घसरणीमुळं बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 472 लाख कोटींवरुन 464 लाख कोटींवर आलं आहे.

बाजार विश्लेषकांच्या मते शेअर बाजारातील घसरणीचं प्रमुख कारण भू राजनैतिक तणाव हे आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या शक्यतेनं गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत. मध्य पूर्व म्हणजेच आखाती देश संपूर्ण जगाला क्रूड ऑईलचा पुरवठा करतात. स्ट्रेट ऑफ हॉहमुज कच्च्या तेलाच्या निर्यातीचा महत्त्वाचा मार्ग आहे. या ठिकाणी अडथळा निर्माण झाल्यास कच्चा तेलाचे दर वाढू शकतात. जागतिक स्तरावर महागाई वाढू शकतो आणि शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

सलग तीन दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजारात नफा वसूल करण्याचा ट्रेंड पाहायला मिळालं. सेन्सेक्स आणि निफ्टीत गेल्या तीन दिवसात 1.4 टक्क्यांची तेजी दिसून आली होती. 

शेअर बाजारातील घसरणीचं प्रमुख कारण कच्चे तेल महाग होणे हे देखील आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य तणावाच्या शक्यतेनं ब्रेंट क्रूड ऑईलचा दर 70 डॉलर प्रति बॅरल पर्यंत राहू शकतो. खनिज तेलाच्या दरात वाढ झाल्यास त्याचा भारतासारख्या खनिज तेल आयातदार देशाला मोठा फटका बसू शकतो, यामुळं गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. 

बँकिंग शेअरमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. कोटक महिंद्रा बँक, एक्सिस बँक, इंडसइंड बँकच्या शेअरमध्ये घसरण झाली. श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स, एसबीआय लाईफ  इन्शुरन्सच्या शेअरमध्ये घसरण झाली.   
 
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.