अढळ निष्ठा अन् अजेय शौर्य ..शिवजयंतीदिनी ‘राजा शिवाजी’चे दमदार पोस्टर रिलीज; कधी होणार प्रदर्शित ?
abp majha web team February 19, 2026 06:43 PM

Raja Shivaji: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या औचित्याने बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे अधिकृत पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आले. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असून पोस्टरमधील त्यांचा लूक चर्चेत आला आहे. इतिहास साक्षी आहे त्या अढळ निष्ठेचा आणि अजेय शौर्याचा. एक अशी गाथा, जी केवळ कथा नाही तर आहे ‘एक वचन, एक स्वराज्य, एक संपूर्ण राष्ट्राचा अभिमान’ या ओळी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत.

नुकत्याच समोर आलेल्या पोस्टरमध्ये रितेश देशमुख भगवा ध्वज हातात घेत करारी मुद्रेत दिसत आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले त्यांचे व्यक्तिमत्व आणि तेजस्वी प्रकाशयोजना यामुळे चित्रपटाची भव्यता अधोरेखित होते. ‘एक वचन, एक स्वराज्य, एक राष्ट्राचा अभिमान’ अशी टॅगलाईनही पोस्टरवर लक्ष वेधून घेत आहे.

स्वराज्य लढ्याची गाथा उलगडणार

हा भव्य ऐतिहासिक ॲक्शन-ड्रामा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि दूरदृष्टीचा गौरव करणारा सिनेमॅटिक अनुभव देणार असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या स्वराज्याच्या लढ्याची गाथा या चित्रपटातून प्रभावीपणे मांडली जाणार आहे.

चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी प्रसिद्ध संगीतकार जोडी Ajay-Atul यांच्याकडे आहे, तर नामांकित छायाचित्रकार Santosh Sivan या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या दृश्य आणि श्राव्य मांडणीबाबत उत्सुकता वाढली आहे.

कधी होणार प्रदर्शित ?

ज्योती देशपांडे आणि जेनेलिया डिसूझा निर्मित, रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी, म्हणजेच महाराष्ट्र दिनी, जगभर प्रदर्शित होणार आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी, दमदार स्टारकास्ट आणि भव्य मांडणीमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त

केली जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.