गडचिरोली: मुरूम उत्खननप्रकरणी एका मजुराला बेदम मारहाण केल्याच्या आरोपावरून आरमोरी विधानसभेचे काँग्रेसचे (Congress) आमदार रामदास मसराम यांच्यासह सहा जणांविरुद्ध देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल विकास राजगडे असे मजुराचे नाव असून तो गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर गडचिरोली (Gadchiroli) जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील कोंढाळा येथे रेल्वेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मंगळवारी मध्यरात्री मुरुम उपसा सुरू असताना आमदार मसराम आपल्या पाच सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. येथे मुरुम उत्खनन कसे काय सुरू आहे, अशी विचारणा करत त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या मजुरांशी हुज्जत घातली. यावेळी कुणालने तहसील कार्यालयाची रीतसर परवानगी असल्याचे सांगत, कंत्राटदाराकडे चौकशी करण्याचा सल्ला दिला. यावरून वाद विकोपाला गेला आणि चिडलेल्या जमावाने काठीने व हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप कुणालने तक्रारीत केला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी आमदार रामदास मसराम यांच्यासह निवृत्त शिक्षक धनपाल मिसार, अमोल मिसार, सागर वाढई, ज्ञानदेव पिलारे आणि चालक विजय भुरले यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मुंबई विमानतळावर मोठी कारवाई; हिरे, सोनं अन् कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त, 8 जणांना अटक
आणखी वाचा