जुहूगावातील बेकायदा इमारतीवर सिडकोची कारवाई
नेरूळ, ता. १९ (बातमीदार) : नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांविरोधात सिडकोने सुरू केलेल्या मोहिमेत जुहूगाव येथे उभारण्यात आलेल्या बेकायदा चार मजली इमारतीवर मंगळवारी (ता. १७) हातोडा चालवण्यात आला. सुमारे ६७२ चौरस मीटर क्षेत्रफळावरील या इमारतीबाबत बांधकामधारक विनय गोपाळे यांना पूर्वीच नोटीस देण्यात आली होती; मात्र प्रतिसाद न मिळाल्याने सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कडेकोट पोलिस बंदोबस्तात कारवाई केली. दरम्यान, कारवाईत पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात असला तरी अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.