Maharashtra Political Updates : भिवंडीत काँग्रेसचा मोठा 'गेम'; नारायण चौधरींनी खेचलं महापौरपद!
Sarkarnama February 20, 2026 05:45 PM
भिवंडीत काँग्रेसचा मोठा 'गेम'; नारायण चौधरींनी खेचलं महापौरपद!

भिवंडीमध्ये महापौर निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला. भिवंडी महापौर निवडणुकीत नारायण चौधरी विजय होत महापौर झाले. भाजपच्या नगरसेवकांमध्ये पडलेली फुटीमुळे काँग्रेसचे पारडे जड मानले जात होते. भाजपने नारायण चौधरी यांना डावलून स्नेहा पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे चौधरी यांनी थेट बंडखोरी करत काँग्रेसशी हातमिळवणी केली.

पुण्यात अमोल कोल्हेंच्या व्याख्यानावरून थेट कुलगुरूंकडे तक्रार दाखल!

पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाला विद्यार्थी संघनांनी तीव्र विरोध दर्शवला असून याप्रकरणी थेट विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे हा कार्यक्रम होणार का याबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

Kolhapur News : कोल्हापुरात महायुतीचे दोन गटनेते एकमेकाला भिडले, प्रकरण हमरीतुमरीवर

शेवटचा दिवस तोंडावर आला तरी आजून कोल्हापूर महापालिकेतील समितीवरील सदस्यांची निवड करण्यात आली नव्हती. त्यामुळे कोणाच्या नावाची वर्णी लागणार, याची उत्सुकता होती. त्या संदर्भात गुरुवारी महायुतीच्या गटनेत्यासह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक एका कार्यालयात पार पडली. तीन गटनेत्यांची बैठक सुरू असताना दोन गटनेत्यांमध्ये सुरू झालेली चर्चा हमरीतुमरीवर येऊन प्रकरण हातघाईपर्यंत गेले. एकमेकांचा एकेरी उल्लेख करीत बघून घेण्याची भाषाही वापरली गेली. त्यात जोरदार वादावादी झाली.त्यानंतर सदस्यांची निवड झाली.

अमोल कोल्हेंच्या व्याख्यानाला विरोध

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात खासदार अमोल कोल्हे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या व्याख्यानाला विद्यार्थी संघटनांकडून विरोध करत ते रद्द करण्याची मागणी कुलगुरूंकडे करण्यात आली आहे. या विद्यार्थी संघटना भाजप समर्थ असल्याची टीका करण्यात येत आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या पहिल्याच जनरल सभेला ऑडियो बॉम्ब फुटला

कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसच्या दोन स्वीकृत नगरसेवक नेमणुकीला शिवसेना नेते सुनील कदम यांचा आक्षेप.

ठाकरे गटाचे नेते आणि शहर प्रमुख सुनील मोदी आणि काँग्रेसचे मुस्ताक मलबारी याच्या नावाला विरोध

HCL नावाच्या कंपनीला कोल्हापुरात आणताना सुनील मोदी यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप, टी डी आर घोटाळ्यात मोदीचा सहभाग असल्याचा देखील आरोप.

काँग्रेसचे मुस्ताक मलबारी हे महानगरपालिकेचे थकबाकीदार असल्याचा देखील आरोप.

शिवसेना नेते सुनील कदम यांनी महापौर रूपाराणी निकम यांना दिले लेखी निवेदन.

भिवंडी महापौर निवडणूक भाजपकडून व्हिप

भिवंडी महापालिका महापौर निवडणुकीच्या आधी भाजपने आपल्या उमेदवारांना व्हिप जारी केला आहे. भाजपचे दहा सदस्य फुटले असून ते काँग्रेससोबत गेले आहे. त्यामुळे या निवडणुकीत फुटलेले सदस्य व्हिप पाळणार का? याची चर्चा आहे.

भिवंडी काँग्रेसअंतर्गत वाद

भिवंडी महापालिका महापौर पद निवडणूक आज होत आहे. या निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये दोन गट पडल्याचा फायदा काँग्रेस पक्षाला होणार आहे. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी समाजवादी पक्षाच्या आमदारांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला असल्याचा आरोप काँग्रेसचे भिवंडी शराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांनी केला आहे.या संदर्भातील लेखी तक्रार मोमीन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे केली आहे.शहराध्यक्षांच्या नाराजीमुळे काँग्रेसमध्ये देखील नाराजी उफाळून आली असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसची दिल्लीत महत्त्वाची बैठक, सपकाळ तातडीने दिल्लीकडे रवाना

काँग्रेस पक्षाने आज दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी 7 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना तातडीने दिल्लीत बोलावलं आहे. तर या बैठकीसाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

शिवजयंतीच्या मिरवणुकीत किरकोळ कारणावरून दोन गटात वाद

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे गावात काल छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून दोन गट आमने-सामने आले होते. मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

मुळशीत कुस्तीच्या आखाड्यातच सिकंदर शेखवर हल्ल्या

पुण्यातील मुळशी तालुक्यातील पौड गावात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निकाली कुस्ती स्पर्धेत थेट आखाड्यात घुसून महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्याचा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे.

जयकुमार गोरेंबाबत बोलताना भीती वाटते, शंभूराज देसाईंचा टोला

सातारा जिल्हा परिषदेत काहीही झालं तरी भाजपचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होणार, असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी टोला लगावला आहे. देसाई म्हणाले, "ते आमच्यापेक्षा मोठे आणि दिग्गज मंत्री ते आहेत.त्यांच्या वक्तव्यावर बोलताना आम्हाला भीती वाटते म्हणून आम्ही बोलत नाही कारण लगेच त्यांच्याकडून दुसरा पालकमंत्री नेमला जातो."

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.