आपण अनेकदा आपल्या कष्टाची कमाई, सोने, चांदीचे दागिने सुरक्षित राहावेत म्हणून आपण बँकेच्या लॉकरचा आधार घेतो. मात्र जर याच लॉकरमधून चोरी झाली तर? टेन्शन आलं ना… पण आता याबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे.
बँकेच्या निष्काळजीपणामुळे लॉकरमधील वस्तूंचे नुकसान झाल्यास, बँकांना आता संबंधित ग्राहकाला लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या १०० पट भरपाई द्यावी लागणार आहे. आरबीआयच्या सुधारित नियमांनुसार, जर बँकेला आग लागल्यास किंवा बँकेची इमारत कोसळून नुकसान झाले तर हा नियम लागू होईल.
बँकेत चोरी किंवा सशस्त्र दरोडा पडल्यास किंवा बँकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने फसवणूक केल्यामुळे ग्राहकाचे नुकसान झाले तरीही हा नियम लागू होईल. मात्र काही काही नैसर्गिक आणि तांत्रिक कारणांमध्ये बँकांना या नियमातून सवलत देण्यात आली आहे.
भूकंप, महापूर किंवा वीज कोसळणे यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे नुकसान झाले असेल किंवा जर ग्राहकाने स्वतःचा पासवर्ड/किल्ली नीट न सांभाळल्यामुळे किंवा स्वतःच्या निष्काळजीपणामुळे नुकसान झाले किंवा लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचा नैसर्गिक रितीने रंग उडणे किंवा झीज होणे अशावेळी नुकसान भरपाई दिली जाणार नाही.
आरबीआयने सर्व बँकांना आपल्या ग्राहकांकडून नवीन लॉकर एग्रीमेंट करून घेण्याचे निर्देश दिले आहेत. यात भरपाईच्या अटींचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. बँकेच्या लॉकरमध्ये नेमके काय आहे याची माहिती बँकेला नसते. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या दागिन्यांचे फोटो किंवा संबंधित बिले सुरक्षित ठेवणे फायद्याचे ठरू शकते, असेही आरबीआयने नमूद केले आहे.