रमजानची तारीख कशी ठरते? रमजानचा सण दरवर्षी 11 दिवसांनी मागे कसा येतो?
BBC Marathi February 20, 2026 09:46 PM
Getty Images रमजान महिना संपल्यावर ईद-उल-फित्र हा सण साजरा केला जातो. एकेमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या जातात.

भारतातील तसंच जगभरातील मुस्लीम नागरिक ईद-उल-फित्रच्या तयारीत आहेत.

मुस्लीम धर्मीयांमध्ये ईद हा सण अत्यंत पवित्र मानला जातो. रमजान ईद मुस्लीम धर्मींयांचा सर्वात मोठा सण म्हणूनही ओळखला जातो.

रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी ईद-उल-फित्र साजरी केली जाते. रमजान महिना म्हणजे प्रार्थना आणि रोजा (उपवास) करण्याचा महिना.

ईद-उल-फित्र याचं शब्दशः भाषांतर करायचं झाल्यास उपवास सोडताना साजरा केला जाणारा सण असं करता येऊ शकेल.

ईद महिना संपल्यानंतर पहिल्यांदा चंद्र दिसतो, त्यावेळी रमजान ईद साजरी होते.

ईद साजरी कशी करतात?

ईदच्या दिवशी मुस्लीम नवे कपडे घालून मशिदीत जातात. शिरखुर्मासारखे गोड पदार्थ घरात बनवले जातात.

ईदची नमाज अदा करण्यापूर्वी गरिबांना दान स्वरुपात काहीतरी देण्याची परंपरा आहे. या दानाला 'जकात' असं संबोधलं जातं. प्रत्येक मुस्लीम व्यक्ती ही 'जकात' देऊन नमाज पठण करण्यास जाते.

Huw Evans Picture Agency मुंबईतील वांद्रे येथील नमाजाचे दृश्य.

नमाजानंतर परतताच मित्र-नातेवाईकांसोबत जेवणावर यथेच्छ ताव मारला जातो. एकमेकांना भेटवस्तू, पैसे दिले जातात. याला ईदी असं म्हटलं जातं. जगभरातील अनेक देशांमध्ये ईदला सार्वजनिक सुटी असते.

एखाद्या व्यक्तीला ईदच्या शुभेच्छा द्यायच्या असल्यास त्यांना 'ईद-मुबारक' म्हणून शुभेच्छा दिल्या जातात.

रमजान म्हणजे काय?

रमजान हे एक अरेबिक नाव आहे. इस्लामिक कॅलेंडरमधील नवव्या महिन्याला रमजान महिना म्हणून ओळखलं जातं. मुस्लीम धर्मियांसाठी हा अत्यंत पवित्र महिना आहे.

मुस्लीम धर्मातील पाच मूळ तत्त्वांपैकी एक म्हणूनही रमजान महिना ओळखला जातो. प्रत्येक मुस्लीम व्यक्तीला ही पाच मूळ तत्त्वं पाळावीच लागतात. अल्लाहने तसा आदेश दिला आहे, असंही म्हटलं जातं.

Getty Images रमजान हे एक अरेबिक नाव आहे. इस्लामिक कॅलेंडरमधील नवव्या महिन्याला रमजान महिना म्हणून ओळखलं जातं. मुस्लीम धर्मियांसाठी हा अत्यंत पवित्र महिना आहे.

रमजान महिन्यातच पवित्र कुराण या ग्रंथाचे सुरुवातीची वचनं लिहिली गेली, अशी मुस्लीम धर्मीयांमध्ये मान्यता आहे. त्यामुळेच या काळात कुराण पठण करण्यावर अधिक भर दिला जातो.

शिवाय, रोजा करणं हा प्रार्थना करण्याचा, अल्लाहच्या जवळ जाण्यासाठीचा एक मार्ग असल्याची मुस्लीम बांधव मानतात. आरोग्य आणि स्वयंशिस्त उत्तम राहण्यासाठीही रोजा करणं चांगलं असल्याचं म्हटलं आहे.

रमजान ईदचा सण दरवर्षी 11 दिवसांनी मागे का येतो?

चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. चंद्राला एका अवस्थेत पुन्हा येण्यासाठी साधारणपणे 29.5 दिवसांचा काळ लागतो. म्हणजेच एका अमावस्येनंतर पुढची अमावस्या यायला 29.5 दिवस लागतात.

जगभरामध्ये सर्वत्र Solar म्हणजे सौर कॅलेंडरचा वापर केला जातो. हिंदू धर्मिय Lunisolar कॅलेंडरचा वापर करतात.

हा दोन अमावस्यांमधला काळ एक महिना म्हणून गणला जातो. असे 12 महिने मिळून एक चांद्र वर्ष होते. एका महिन्यात केवळ 29.5 दिवस असल्यामुळे या चांद्र वर्षात केवळ 354 दिवस असतात.

सौर कॅलेंडरमध्ये मात्र 365 दिवस असल्याचं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळेच चांद्र कॅलेंडर आणि सौर कॅलेंडरमध्ये 11 दिवसांचा (365-354) फरक पडतो. यामुळेच दरवर्षी रमजान ईदचा सण 11 दिवसांनी मागे येतो.

Getty Images जगभरामध्ये सर्वत्र Solar म्हणजे सौर कॅलेंडरचा वापर केला जातो. हिंदू धर्मिय Lunisolar कॅलेंडरचा वापर करतात.

आता भारतात हिंदू धर्मिय साजरे करत असलेले सण ठराविक ऋतूतच कसे येतात असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो.

यांचं कारण हिंदू धर्मियांनी Lunisolar कॅलेंडरचा स्वीकार केल्याचं खगोल आणि पंचांग अभ्यासक दा. कृ. सोमण सांगतात.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "हिंदू कालगणनेने चांद्र आणि सूर्य कॅलेंडरचा मेळ घातला आहे. एक सौरवर्ष 365 दिवसांचं असतं. चांद्र वर्ष आणि सौरवर्षातला 11 दिवसांचा फरक दर तीन वर्षांनी कॅलेंडरमध्ये अधिक महिन्याने भरून काढला जातो.

म्हणजेच थोडक्यात असे अनुशेषाच्या 11 दिवसांचे 33 दिवस साठले की, अधिक महिना येतो. फक्त चांद्र कॅलेंडरचा वापर केल्यास सौर कॅलेंडरपेक्षा 11 दिवसांचा सतत फरक पडत जाईल."

"ज्यावेळेस एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो तेव्हा त्यातल्या पहिल्या महिन्यास अधिकमास आणि दुसऱ्याला निजमास म्हटलं जातो. म्हणजेच ज्या चांद्र महिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिकमास होतो", असं सोमण सांगतात.

रमजान काळातील दिनचर्या

रमजान महिन्यात पहाटे सूर्य उगवण्याच्या आधीच जेवळ केलं जातं. यावेळी भरपेट आणि पौष्टिक जेवण केलं जातं. याला सहरी किंवा सहूर असं म्हणतात. त्यानंतर सूर्यास्तानंतर जेवण करून रोजा सोडतात. त्याला इफ्तार किंवा फितूर म्हटलं जातं.

रमजानच्या काळात दान करण्यालाही मुस्लीम धर्मीयांमध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं जातं.

संयम, सदाचार यांचं पालन करून अल्लाहसोबतचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी हे महत्त्वाचं आहे.

याशिवाय रमजान महिन्यात तरावीहसुद्धा केली जाते. रात्रीच्या वेळी मशिदीत करण्यात येणाऱ्या प्रार्थनेला तरावीह असं संबोधतात. फक्त रमजान महिन्यातच तरावीह प्रार्थना केली जाते, हे विशेष.

रमजान ईद कधी साजरी केली जाते याबद्दल सोमण म्हणाले, "मुस्लीम कॅलेंडरमध्ये रमजान हा नववा महिना आहे. या महिन्याच्या अमावस्येनंतर चांद्रदर्शन झाल्यावर पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी रमजान ईद साजरा केला जातो.

यानंतर शव्वाल महिना सुरू होतो. रमजान महिन्याच्या काळामध्ये प्रेषितांच्या साहाय्याने पवित्र कुराण स्वर्गातून पृथ्वीवर आले असं मानलं जातं. त्यामुळे चंद्रदर्शन झाल्यावर ईद- उल-फित्र हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. लोक एकमेकांना भेटून शुभेच्छा देतात."

रमजान ईदबद्दल सांगताना मुंब्रा येथील इस्लाम धर्माचे अभ्यास सैफ आसरे सांगतात, "हा महिना इस्लाम धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो.

रमजान महिन्याची सुरुवात चंद्र दर्शनाने झाली की त्याच्या दुसऱ्या दिवसापासून रोजे (उपवास) केले जातात. या दिवसापासून जन्नतचे (स्वर्गाचे) दार उघडले जाते आणि जहान्नुमचे (नरकाचे) बंद केले जाते."

"रमजानच्या महिन्यात रोजा, नमाज, शब-ए-कद्रची रात्र, कुराण आणि जकातुल फित्र या गोष्टी महत्त्वाच्या असतात असं आसरे सांगतात. ते म्हणाले, रोज पहाटे सूर्योदयापूर्वी न्याहारी करून नंतर संध्याकाळी सूर्यास्तावेळी जेवण केलं जातं.

दररोजच्या पाच नमाजांव्यतिरिक्त रात्री तराविहची विशेष नमाज आयोजित केली जाते. शब-ए-कद्रही रात्र अत्यंत पवित्र मानली जाते कारण या रात्री दिव्य कुराणाचे अवतरण सुरू झाले.

या महिन्यात आर्थिक स्थिती चांगली असणाऱ्या कुटुंबांकडून एकूण उत्पन्नाच्या 2.5 टक्के उत्पन्न किंवा धान्य गरीब कुटुंबाना दिलं जातं. प्रत्येक व्यक्तीमागे 2.5 किलो धान्याचा दानधर्मही केला जातो."

ईदची वेळ ठरवण्यात का अडचणी येतात?

ईदचा दिवस चांद्र कॅलेंडरचा 10वा महिना 'शव्वाल'च्या पहिल्या तारखेला येतो. पण ईदचा मूळ दिवस कोणता असावा यावर इस्लाममध्ये चर्चा होत आली आहे.

अनेक देशातले मुस्लीम लोक स्वत: चंद्र पाहण्याऐवजी त्या देशात चंद्र पाहण्यास जबाबदारी दिलेल्या अधिकाऱ्यांवर अवलंबून राहतात.

PA Media ईदचा दिवस चांद्र कॅलेंडरचा 10वा महिना 'शव्वाल'च्या पहिल्या तारखेला येतो. पण ईदचा मुळ दिवस कोणता असावा यावर इस्लाममध्ये चर्चा होत आली आहे.

तर काही ठिकाणी सौर कॅलेंडरचाही आधार घेतला जातो. तर इतर ठिकाणी खगोलशास्त्राचीही मदत घेतली जाते.

सुन्नी बहुल मुस्लीम देशांत सौदी अरेबियानं ठरवलेल्या वेळी ईद साजरी करतात. तर शिया बहुल मुस्लीम देशात इराणने ठरवलेली ईदची वेळ साजरी करतात.

त्यामुळेच जगभरातले मुस्लीम एकाच दिवशी ईद साजरी करत नाहीत. ईद साजरी करण्यात एक ते दोन दिवसांचा फरक आढळतो.

रोजा कोण करू शकतो?

मुस्लीम धर्मीयांमध्ये निरोगी असलेल्या व्यक्तीनेच रमजान करावं, अशी सूचना आहे.

लहान मुले, गर्भवती महिला, मासिक पाळी सुरू असलेल्या महिला, प्रवासी, आजारी असलेल्या, उपवासाने त्रास होऊ शकणाऱ्या लोकांना रोजातून सूट आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

  • रमजान: रोजा सोडताना खजूरच का खातात? श्रद्धेसोबतच दडलंय आरोग्याचं मोठं गुपित
  • रमजानमध्ये उपवासादरम्यान कशी घ्याल आरोग्याची काळजी?
  • जगातील सर्व मुसलमान एकाच दिवशी ईद का साजरी करत नाहीत?
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.