26039
कणकवलीत देवतांचे चित्ररथ लक्षवेधी
महापुरूष मंदिराच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २० : कणकवली शहरातील श्रीदेव महापुरूष मंदिराच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमांना आजपासून प्रारंभ झाला. त्यानिमित्ताने कणकवली शहरातून नवीन मूर्ती आणि कलशाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यात विविध देवता मूर्तींचे चित्ररथ लक्ष वेधून घेत होते. बाजारपेठेतील महिला वर्ग या मिरवणुकीत प्रामुख्याने सहभागी झाला होता.
मिरवणुकीचा प्रारंभ भालचंद्र महाराज संस्थान येथून झाला. त्यानंतर पटकीदेवी मंदिर, ढालकाठी मार्गे ही मिरवणूक महापुरुष मंदिरात दाखल झाली. सिंधुगर्जना ढोल पथकाने ढोल-ताशांच्या गजरात वातावरण भारावून टाकले. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी सादर केलेले लेझिम नृत्य विशेष आकर्षण ठरले. टाळ-मृदुंगाच्या तालावर वारकऱ्यांनी ठेका धरत वारकरी संप्रदायाचे दर्शन घडविले. या मिरवणुकीत नगराध्यक्ष संदेश पारकर, मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी, उपाध्यक्ष राजू पारकर, सचिव महेंद्र सांबरेकर, खजिनदार मंदार सापळे, नगरसेविका सुमेधा अंधारी, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम यांच्यासह महिला वर्ग, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..
---
आज होणारे कार्यक्रम
महापुरूष मंदिराच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ता उद्या २१ रोजी सकाळी श्रींच्या मूर्तीची नित्यपूजा, अभिषेक, वास्तुहोम आदी धार्मिक विधी पार पडणार आहेत. सकाळी ८ ते १२ या वेळेत रक्तदान शिबिर होईल. दुपारी महाआरती आणि महाप्रसाद, रात्री ८ वाजता वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान निर्मित ‘पडीक’ हे बालनाट्य सादर होईल. रात्री ९ वाजता महापुरुष मित्रमंडळातील महिलांचा ‘व्वा वुमनिया’ हा विशेष कलाविष्कार होणार आहे.