गराडे, ता. २१ : हिवरे (ता. पुरंदर) गावात गेली पाच वर्ष एक गाव एक शिवजयंती हा उपक्रम राबविला जात आहे. यावर्षीही पारंपरिक भारतीय संस्कृतीच्या वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भगव्या पताकांनी सजलेले गाव, रामकृष्णहरी या गजरात शिवाजी महाराज यांचा पुतळा पालखीत ठेवून काढलेली मिरवणूक आणि शिवरायांच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी बोलताना व्याख्याते अजिंक्य धरासकर म्हणाले, ‘‘धर्म म्हणजे केवळ पूजा-अर्चा नव्हे, तर कर्तव्य, नैतिकता, समाजहिताची जाणीव आहे. शिवाजी महाराजांनी धर्माचे रक्षण करताना सर्व धर्मांना समान आदर दिला.’’
धरासकर यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या आणि दूरदृष्टीच्या अनेक कथा सांगितल्या. फतेह खानाचा पराभव, पुरंदराचे युद्ध, शंभू राजांचे बलिदान, स्वराज्याची पायाभरणी यांसारख्या प्रसंगांचे वर्णन करताना श्रोते मंत्रमुग्ध झाले. शिवरायांचे आणि शंभू राजांचे शौर्य, संघटन कौशल्य आणि प्रजेप्रती असलेले प्रेम यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. युवक-युवतींनी देशभक्तिपर गीतांनी वातावरण भारावून टाकले.
12606, 12607, 12608