- ईश्वर खामकर
किल्लेधारूर - बीड जिल्ह्यातील धारूर शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या भुईकोट प्रकारातील महादुर्ग किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी राज्य शासनाने ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
शहराच्या पश्चिमेस पूर्वेकडे तोंड करून थाटात उभा असलेला महादुर्ग किल्ला ३७ एकर परिसरात विस्तारलेल्या या किल्ल्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मराठा साम्राज्यातील पराक्रमी सरदार नेताजी पालकर यांच्या आगमनामुळे या भूमीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे इतिहासप्रेमींसाठी हा किल्ला आकर्षणाचे केंद्र ठरू शकतो.
मात्र गेल्या काही वर्षांत तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वार आणि आतील रचनांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती. झाडाझुडपांनी व्यापलेला परिसर, मोडकळीस आलेल्या भिंती आणि अपुरी देखभाल यामुळे पर्यटकांचा ओघ घटला होता. स्थानिक नागरिक, इतिहास अभ्यासक आणि विविध सामाजिक संघटनांनी पुरातत्व विभागाकडे वारंवार निवेदने देत दुरुस्तीची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर राज्याच्या संस्कृती व पर्यटन विभागाने सकारात्मक पाऊल उचलत ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून तटबंदीची दुरुस्ती, बुरुजांचे मजबुतीकरण, प्रवेशद्वारांचे पुनरुत्थान, परिसर सुशोभीकरण, पाथवे निर्मिती, प्रकाशयोजना आणि मूलभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच पर्यटकांना माहिती देण्यासाठी फलक व मार्गदर्शक सुविधा उभारण्याचाही विचार आहे.
किल्ल्याचे जतन आणि सुशोभीकरण झाल्यास धारूर शहराच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळेल. स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच शहराची ऐतिहासिक ओळख अधिक बळकट होईल. महादुर्ग किल्ला नव्या रूपात पर्यटकांसाठी खुले झाल्यानंतर धारूर पर्यटन नकाशावर ठळकपणे झळकणार, अशी अपेक्षा व्यक्त होत असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.