POCSO प्रकरणात गुन्हा दाखल, इतक्या खालच्या पातळीवर आरोप होईल याची कल्पना नव्हती, शंकराचार्यांची पहिली प्रतिक्रिया
एबीपी माझा ब्युरो February 22, 2026 06:43 PM

मुंबई : उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यातील वादाने आता पुढचा टप्पा गाठल्याचं दिसतंय. पोक्सो कायद्याअंतर्गत झुंसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यावर आरोप केले जातील हे माहिती होतं, पण इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले जातील याची कल्पना नव्हती असं स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले. तसेच आता धर्मयुद्ध सुरू झालं असून त्यासाठी आम्ही तयार आहोत असंही ते म्हणाले. 

अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाल्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार झुंसी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाकुंभरी पीठाधीश्वर आशुतोष ब्रह्मचारी महाराज यांनी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या विरोधात अल्पवयीन बालकांचे लैंगिक शोषक केल्याचा आरोप केला होता.

एबीपी न्यूजशी बोलताना त्यांनी पुढील कारवाई आणि चौकशीसंदर्भात पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. एखाद्यावर आरोप झाल्यास तो चुकीचा असल्याचं सिद्ध करण्यासाठी तो व्यक्ती तयार असतो, आम्हीही त्यासाठी तयार आहोत, असं ते म्हणाले. 

पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद (POCSO Case Prayagraj)

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या विरोधात प्रयागराजमधील झुंसी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेच्या शक्यतेबाबत विचारले असता, “मुख्यमंत्र्यांच्या पोलिसांची काम करण्याची पद्धत सर्वांना माहिती आहे. अटक करायची असल्यास करा. आम्ही प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तयार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं.

‘धर्मयुद्ध’ सुरू असल्याचा दावा (Dharma Yudh Statement)

स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी या प्रकरणाला 'धर्मयुद्ध' असं संबोधलं. सनातन धर्माच्या नावाखाली काही लोक किती नीच पातळीवर जाऊ शकतात, हे दिसत आहे. आम्ही सुरू केलेले हे धर्मयुद्ध आता थांबणार नाही, असं ते म्हणाले. 

तसेच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी स्वतःची तुलना सत्याशी केली. 'आम्ही सूर्य आहोत, अभिमानामुळे नाही, तर सत्याशी निष्ठा असल्यामुळे. सूर्याची आभा कोणी झाकू शकत नाही,” असं वक्तव्य त्यांनी केलं. 

आरोपकर्त्याच्या हेतूंवर प्रश्न (Allegation Response)

आरोप करणाऱ्या व्यक्तीच्या हेतूंवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी संबंधित व्यक्तीवर गंभीर आरोप केले. “गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती मोकाट फिरत आहे, त्याच्यावर पोलीस कारवाई करत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. आपल्याला शेकडो वकिलांचा आणि समर्थकांचा पाठिंबा मिळत असल्याचा दावा स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केला.

दरम्यान, या प्रकरणात पुढील तपास सुरू असून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणामुळे उत्तर प्रदेशातील राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे.

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.