कडक उन्हामुळे लिंबाच्या दरात तेजी
esakal February 23, 2026 02:45 AM

मार्केट यार्ड, ता. २२ : उन्हाचा कडाका दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे बाजारात लिंबू चांगलेच भाव खात आहे. बाजारात लिंबाची आवक कमी झाली आहे. किरकोळ बाजारात एक लिंबू दर्जानुसार ५ ते ७ रुपयांना मिळत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने दर तेजीत आहेत. घाऊक बाजारात दर्जानुसार एक गोणी ५०० ते १२०० रुपयांना विकली जात आहे.
बाजारात रसाळ, मोठ्या आकाराच्या लिंबांचे दर जास्त असूनही त्यांना अधिक मागणी होत आहे. मागील महिनाभरापासून लिंबांना मागणी वाढली आहे. त्यामुळे भावात प्रचंड वाढ झाली आहे. जूनपर्यंत हीच स्थिती कायम राहील, असे मार्केट यार्डातील लिंबाचे व्यापारी रोहन जाधव यांनी सांगितले. बाजारात राशिणसह अहिल्यानगर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातून लिंबाची आवक होत आहे. तसेच कर्नाटक राज्यातील विजयनगर भागातूनही लिंबाची आवक होत आहे. मात्र, याचे प्रमाण कमी आहे.
सध्या बाजारात एक ते दीड हजार गोणी लिंबाची आवक होत आहे. उत्पादित भागातील पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्याबरोबर आवक कमी होत जाण्याचा अंदाज आहे. सध्या शहरासह जिल्ह्यातील किरकोळ विक्रेत्यांकडूनही लिंबाची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहे. येत्या काळात आवकीच्या तुलनेत मागणी अधिक असणार आहे. घरगुती वापराबरोबरच हॉटेल, रसवंतीगृह आणि ज्यूस सेंटरकडून लिंबाला मोठी मागणी असते. मागील काही दिवसांपासून शहरात उन्हाचा कडाका जाणवू लागल्याने मागणी वाढली आहे.


लिंबाला बाराही महिने मागणी असते. मात्र, उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात असते. जून महिन्यापर्यंत लिंबाचे दर तेजीत राहणार आहेत. उन्हाळ्यात लिंबाच्या झाडांना पाणी भरपूर लागते. पाणी चांगले मिळाले तर उत्पन्न चांगले निघते. परंतु अनेक शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाणी कमी पडते. त्यामुळे त्याचा परिणाम लिंबाच्या उत्पन्नावर होत आहे. येत्या काळात भावात आणखी वाढ होणार आहे.
- रोहन जाधव, लिंबाचे व्यापारी, मार्केट यार्ड

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.