निगडी, ता.२२ ः तेलंगणातील सामाजिक कार्यकर्ते रामावत नर्यानाईक यांना स्वातंत्रवीर सावरकर मंडळातर्फे यंदाचा राष्ट्रीय स्तरावरील तर भिल्ल समाजासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अकोल्याचे गजानन सोलकर यांना राज्यस्तरीय स्वातंत्रवीर सावरकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे १८ वे वर्ष आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी गुरुवारी (ता.२६) निगडीतील ग.दि.माडगुळकर नाट्यगृहात सायंकाळी ६.३० वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. सनातनी चिंतक, लेखक डॉ. गौतम खट्टर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. रामावत नर्यानाईक (नलगोंडा, तेलंगणा) यांनी संघटनशक्ती, समाजजागृती आणि धार्मिक-सांस्कृतिक मूल्यांची दृढ जपणूक करत विविध स्तरांवर कार्य उभारले आहे. तसेच ग्रामीण भागात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे. तर सोलकर यांनी प्रतिकूल परिस्थितीतही समाजप्रबोधन, पारंपरिक संस्कारांचे पुनरुज्जीवन, उत्सव-परंपरांचा प्रसार आणि ग्रामस्तरावरील संघटनात्मक कार्यामुळे अनेक कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले असून सामाजिक समरसतेचा संदेश बळकट झाल्याचे मंडळाने म्हटले आहे.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष विजयशंकर कर्ता, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे, सचिव ॲड. हर्षदा पोरे, कोषाध्यक्ष विकास देशपांडे आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आले आहे.