दहावीच्या परीक्षेत १० विद्यार्थी बोगस! केंद्र मंगळवेढ्यात अन् विद्यार्थी बेळगाव, सांगली, कोल्हापूरचे; दाढी- मिशीमुळे पर्यवेक्षकास आला संशय अन्...
esakal February 23, 2026 08:45 AM

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता दहावीच्या पहिल्याच मराठी पेपरवेळी पर्यवेक्षक सर्व विद्यार्थ्यांकडील हॉल तिकीट तपासत होते. एका विद्यार्थ्याचे वय २५ पेक्षा जास्त वाटत होते. त्याला पूर्णपणे दाढी-मिशी आलेली होती. पर्यवेक्षकाने त्याच्याकडे कागदपत्रे मागितली व बोर्डाकडून मूळ प्रवेशपत्र मागवून घेतले. त्यावेळी तो तोतया असल्याचे समजले. त्याचवेळी त्याच केंद्रावरील वेगवेगळ्या वर्गांत एकूण दहा विद्यार्थी सापडले. पोलिसांनी त्यांना अटक केली असून मूळ विद्यार्थी फरार आहेत. विशेष बाब म्हणजे मूळ विद्यार्थ्यांचे वयदेखील २० पेक्षा जास्त आहे.

मंगळवेढ्यातील नंदेश्वर येथील श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता दहावीचे परीक्षा केंद्र आहे. २० फेब्रुवारीला विद्यार्थ्यांचा पहिला मराठीचा पेपर होता. अंगझडती घेऊन सर्व परीक्षार्थींना वर्गात सोडण्यात आले. पहिला टप्पा पार झाल्याचा तोतया विद्यार्थ्यांचा आनंद फार काळ टिकला नाही.

उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका वाटपानंतर पर्यवेक्षक हॉल तिकीट तपासत असताना वर्गातील एक विद्यार्थी वयाने खूपच मोठा वाटत होता. खात्री करण्यासाठी पर्यवेक्षकांनी त्याच्याकडे आधारकार्ड मागितले, पण त्याच्याकडे कोणतेही ओळखपत्र नव्हते. त्यावेळी त्या केंद्रावर सर्व परीक्षार्थींची पडताळणी झाली आणि आणखी नऊ विद्यार्थी संशयित आढळले. खात्री करण्यासाठी केंद्र संचालकांनी बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सुतार इंटरनॅशनल स्कूलमधील परीक्षार्थींचे मूळ हॉल तिकीट मागवून घेतले. त्यावेळी परीक्षा द्यायला आलेले १० विद्यार्थी व बोर्डाकडील हॉल तिकिटावरील फोटो वेगवेगळे आढळले. त्यानंतर बनावटगिरी समोर आली.

तोतया विद्यार्थी पैशाच्या आमिषाचे बळी

तोतया विद्यार्थी २२-२३ वर्षांचे असून सात-आठ जणांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे. एक जण कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील आहे. दुसरे सांगली, बेळगाव जिल्ह्यातील आहेत. तोतया विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावरील शाळेचा शिक्का असून तो बनावट की खराखुरा, याचा तपास मंगळवेढा पोलिस करीत आहेत. मूळ विद्यार्थी पास झाल्यावर त्याबदल्यात तोतया विद्यार्थ्यांना काही हजार रुपये मिळणार होते. या विद्यार्थ्यांनी यापूर्वीदेखील असा प्रकार केला असावा, त्यामागे मोठी हुशार व्यक्ती असेल, असा संशय आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद लातूरकर यांनी सांगितले.

प्रकरणाच्या मुळाशी जाऊन होईल चौकशी

लक्ष्मी दहिवडी येथील सुतार इंटरनॅशनल स्कूलमधील दहावीतील १० विद्यार्थ्यांच्या जागी दुसरेच तोतया विद्यार्थी परीक्षा देत होते. पर्यवेक्षकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उजेडात आला. आता त्या शाळेतील पटसंख्या, विद्यार्थ्यांची दैनंदिन बायोमेट्रिक हजेरी, एकूण प्रवेश, परीक्षेला बसलेले विद्यार्थी या बाबींची पडताळणी होईल. ही तोतयागिरी नेमकी कशी झाली, याचा शोध घेतला जाईल.

- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.