Suryakumar Yadav Blames Batting Collapse for Loss to South Africa: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या सुपर-८ फेरीत भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेने मोठा धक्का दिला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला ७६ धावांनी पराभूत केले. हा भारताचा टी२० वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा पराभव ठरला.
या पराभवानंतर आता भारतासमोरील (Team India) अडचणी वाढल्या असून यानंतरचा प्रत्येक सामना आता 'करो वा मरो' असा असणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवावर सामन्यानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) प्रतिक्रिया दिली आहे.
T20 WC, IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने रोखला भारताचा विजयी रथ! अहमदाबादमध्ये मोठा उलटफेर, सुपर-८ मध्ये चुरस वाढलीया सामन्यात जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगने दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीलाच मोठे धक्के दिल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेने २० षटकात ७ बाद १८७ धावा उभारल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी डेव्हिड मिलरने ६३ धावांची खेळी केली, तर डेवाल्ड ब्रेव्हिसने ४५ आणि ट्रिस्टन स्टब्सने नाबाद ४४ धावा केल्या.
भारतासाठी जसप्रीत बुमराहने ४ षटकात १५ धावा देत ३ विकेट्स घेतल्या, तर अर्शदीप सिंगने ४ षटकात २८ धावा देत २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर भारतीय संघ १८.५ षटकात १११ धावांवरच सर्वबाद झाला. भारताकडून एकट्या शिवम दुबेने झुंज दिली. त्याने ३७ चेंडूत सर्वाधिक ४२ धावा केल्या. पण बाकी कोणीही २० धावांचा टप्पाही पार केला नाही. दक्षिण आफ्रिकेसाठी मार्को यान्सिनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर केशव महाराजने एकाच षटकात ३ विकेट्स घेतल्या. कॉर्बिन बॉशने २ विकेट्स घेतल्या. मार्को यान्सिनलाही १ विकेट मिळाली.
भारताने या स्पर्धेत पहिले चारही सामने जिंकून सुपर - ८ फेरी गाठली होती. पण सुपर - ८ च्या पहिल्यात फेरीत दारुण पराभव झाला. यानंतर सूर्यकुमारने गोलंदाजी चांगली झाल्याचे म्हटले, पण फलंदाजी चांगली करता आली नसल्याचे मान्य केले.
तो म्हणाला, 'मला वाटतं आम्ही नेहमीच सामन्यात होतो. आम्ही सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली होती, २१ धावांवर ३ विकेट्स होत्या, पण त्यानंतर ७ ते १५ षटकात त्यांनी खरंच खूप चांगली फलंदाजी केली. आम्ही त्यानंतर पुन्हा सामन्यात आलो. एकूणच आपण पाहिलं, तर आम्ही चांगली गोलंदाजी केली, पण आम्ही फलंदाजी चांगली करू शकलो नाही.'
'माझ्या विचारांनुसार कधी कधी १८०-१८५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, तुम्ही पॉवरप्लेमध्ये सामना जिंकू शकत नाही, पण तुम्ही पॉवरप्लेमध्ये सामना गमावू शकता. आम्ही पॉवरप्लेमध्ये खूप विकेट्स गमावल्या आणि त्यानंतर आम्ही छोट्या छोट्या भागीदाऱ्या करू शकलो नाही.'
'१८०-१८५ धावांचा पाठलाग करताना तुम्हाला छोट्या भागीदाऱ्यांची गरज असते. पण हा खेळाचा एक भाग आहे. आम्ही यातून शिकलो आणि आता परत जाऊन विचार करू व दमदार पुनरागमन करू.
सूर्यकुमारने जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग या दोघांचेही भरभरून कौतुक केले. तो म्हणाला, 'सर्वांनाच माहित आहे की जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांची जोडी धोकादायक आहे. आकडे फार लक्षात राहत नाही माझ्या, पण जर मी चुकीचा नसेल, तर दोघांनी आज ८ षटके गोलंदाजी केली आणि ४५-५० धावा देत ५ विकेट्स घेतल्या.'
'त्यांनी त्यांच्या भागीदारीत चांगली गोलंदाजी केली आणि आम्हाला त्यांच्याकडून हेच हवे आहे. दोघांनाही अनुभव आहे आणि दोघेही संघात असते चांगले आहे.'
T20 WC, IND vs SA: W,0,W,1,1,W; हार्दिक, रिंकू , अर्शदीप... एकाच षटकात सेम टू सेम OUT! केशव महाराजने ६ चेंडूत फिरवली मॅचशेवटी सूर्यकुमार यादव म्हणाला, 'पुढच्या सामन्यात आशा आहे की आम्ही चांगली फलंदाजी करू, चांगली गोलंदाजी करू आणि चांगले क्षेत्ररक्षण करू. आम्ही गोष्टी सोप्या ठेवण्याचा प्रयत्न करू. आम्हाला जसे क्रिकेट खेळणे अपेक्षित आहे, तसेच खेळू, त्यात बदल होणार नाही. मला वाटतं आम्ही खूप चांगले पुनरागमन करू.'
भारताला सुपर-८ मधील दुसरा सामना २६ फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वेविरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर १ मार्च रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध सामना होणार आहे.