Nashik Ashram School : नाशिकमधील आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन स्थगित; मंत्री अशोक उईके यांच्या मध्यस्थीला यश
esakal February 23, 2026 07:45 PM

नाशिक: आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये खासगी कंपनीमार्फत सुरू असलेल्या कंत्राटी भरतीविरोधात सोमवार (ता. २३)पासून सुरू होणारे बिऱ्हाड आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. मंत्री अशोक उईके यांनी शनिवारी (ता. २१) आंदोलकांशी चर्चा केल्यावर रोजंदारी कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला.

आदिवासी आश्रमशाळा वर्ग तीन व चार कर्मचारी संघटनेने बाह्यस्रोत भरतीविरोधात तब्बल पाच महिने आयुक्तालयासमोर ठिय्या मांडला होता. यानंतर त्यांना मिळालेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने सोमवारपासून सहकुटुंब बिऱ्हाड आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला होता. मंत्री प्रा. उईके शनिवारी नाशिकमध्ये असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, तीत मंगळवारी (ता. २४) मुंबई येथे मंत्री उईके यांच्या उपस्थितीत घेण्यात येणाऱ्या बैठकीत सकारात्मक तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. अगोदर ही बैठक सोमवारी घेण्याचे ठरले होते.

अपात्रांना स्थान दिल्याचा आक्षेप

कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविताना अपात्र व्यक्तींना स्थान दिल्याचा आक्षेप बिऱ्हाड आंदोलकांनी घेतला. भरती प्रक्रियेतील काही आक्षेपार्ह गोष्टींचे पुरावे आमच्याकडे असून, मंगळवारच्या बैठकीत मंत्री प्रा. उईके यांच्यासमोर ते सादर करू, असे रोजंदारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ललितकुमार चौधरी यांनी सांगितले. संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Mumbai BMC Job Scam : मुंबई महापालिकेत नोकरीचे आमिष; मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूरमधील 43 जणांची 33 लाखांची फसवणूक

वर्ग तीनच्या भरतीबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करू, तसेच इतर मागण्यांसंदर्भात मंगळवारी बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय शिष्टमंडळाने घेतला आहे.

- अशोक उईके, आदिवासी विकासमंत्री

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.