सोमाटणे, ता.२३ ः सोमाटणे, धामणे येथे पादचाऱ्यासाठी असलेला अरुंद बंधाऱ्यावरून दुचाकीस्वारांची धोकादायक वाहतूक सुरु असून दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पवना धरणाच्या बांधणीनंतर सन १९७५ साली शेतीच्या जलसिंचनासाठी सोमाटणे गावाजवळ पाटबंधारे विभागाच्या वतीने कोल्हापूर पद्धतीचा दगडी बंधारा बांधण्यात आला होता. या बंधाऱ्यावरून सोमाटणे, धामणे गावातील पादचाऱ्यांना जाण्यासाठी तीन फूट रुंदीचा रस्ता करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे गावातील नागरिकांना पायी जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध झाला होता. बंधाऱ्यावरील रस्ता अरुंद असल्याने एका वेळी केवळ एक नागरिक या रस्त्यावरून पायी जाऊ शकतो. दरम्यानच्या काळात पादचाऱ्यांची जागा दुचाकीनी घेतल्यानंतर या रस्त्यावरून दुचाकींची वाहतूक सुरु झाली. सध्या धामणे गावातील दुध, भाजीपाला विक्रेते, यांसह नागरिकांनी या अरुंद रस्त्यावरून दुचाकीची वाहतूक सुरु केली आहे. हा अरुंद रस्ता व या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पवना नदीचे पात्र खोल असून नदीचा प्रवाह वेगाचा असल्याने दुचाकी चालकांची अपघात होण्याची शक्यता असल्याने पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यावरील रस्त्याला संरक्षक कठडे बसवावे. अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.
PNE26V98175