अजितदादा महाराष्ट्राला न लाभलेले मुख्यमंत्री, त्यांनी पहिल्यांदा टायमिंग चुकवलं; CM फडणवीसांनी सांगितल्या आठवणी, शेवटची भेट...
esakal February 24, 2026 02:45 AM

Fadnavis on Ajit Pawar Legacy : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आजपासून सुरुवात झालीय. पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधानसभेत अजित पवार यांचा शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या आठवणी जाग्या केल्या. अजित पवार हे झपाटून काम करणारे आणि वक्तशीर असे नेते होते. त्यांच्याकडे कधीही फाइल्सचा ढीग नसायचा असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. वक्तशीर असलेले आणि घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजितदादांचं टायमिंग पहिल्यांदाच चुकलं. अजितदादांच्या रुपाने न लाभलेला सीएम गमावला असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या.

अजितदादा हे सकाळी सहा वाजल्यापासून काम करत होते. प्रत्येक क्षणाचा नीट उपयोग करणारे अजितदादा. कोणतीही गोष्ट नियोजनाशिवाय न करणारे अजितदादा. असे नेते राजकारणात विरळ दिसतात. दादा माझ्यापेक्षा ११ वर्षांनी मोठे होते. एक दशकापेक्षा जास्त काळ अतिशय जवळीक होती. अतिशय चांगली मैत्री होती. मी ९९ ला आलो. त्यानंतर दादांची ओळख झाली. पण २०१४ नंतर भावनिक नातं तयार झालं. मी अनेकदा मुलाखतीत सांगायचो की राष्ट्रवादी हे स्ट्रॅटेजिक पार्टनर आहेत. पण अजितदादा हे मित्र होते. त्यांनीही माझ्याकडे त्याच पद्धतीनं पाहिलं. जीवनभर हे नातं कायम होतं असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

MSRTC: पायवाटांना ब्रेक लागणार, आता आदिवासी पाड्यातही लालपरी धावणार; प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार हे बारामतीचे अपराजित नेता असल्याचं म्हटलं. ते म्हणाले की, अजित पवार ८ वेळा बारामती मतदारसंघातून सातत्याने विधानसभा जिंकत राहिले. त्यांनी अनेक विक्रमही केले. बारामतीचा अपराजित नेता म्हणून अजित पवार यांच्याकडे आपण पाहतो. त्यांना जनतेचं प्रेम मिळालं असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

अजित पवार यांच्यासोबतची शेवटची भेट कधी झाली त्याचीही आठवण मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितली. अजितदादांच्या अपघाती निधनाच्या आदल्या दिवशीच २७ जानेवारी २०२६ ला मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यानंतर पायाभूत सुविधांची बैठक झाली. त्यातही अजितदादांनी त्यांच्या स्टाइलमध्ये अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. त्यावर अधिकाऱ्यांनी प्रोजेक्ट दिरंगाईचा मुद्दा उपस्थित केला. सार्वजनिक बांधकाम विभागाचं प्रेझेंटेशन झालं होतं.

सगळ्या बैठका झाल्यावर माझ्या अँटि चेंबरला दोघे गेलो. दादांचं काम १०-१५ मिनिटांचं असायचं. त्यांचं काम कागदावर लिहिलेलं असायचं. दोन तीन ओळीत काय बोलायचं हे असायचं. दादा कामाचं बोलायचे. त्यानंतर ३०-४० मिनिटे आम्ही भविष्यात काय, अर्थंसकल्पाबाबत बोललो. त्यानंतर दादा त्यांच्या कामासाठी निघून गेले. तेव्हा पुसटशी कल्पना नव्हती की ही शेवटची भेट असेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.

अजितदादा दादा कठोर वाटायचे पण आतून प्रेमळ होते. पहिल्यांदा ते कठोर बोलले तरी नंतर त्या व्यक्तीचं काम करायचे. त्यांचा वक्तशीरपणा ही उत्तम सवय होती. अजितदादांचंघड्याळाच्या काट्यानं चालणं खरं असलं तरी पहिल्यांदा त्यांनी टायमिंग चुकवलं असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.

कुठल्याही मुख्यमंत्र्याला अर्थमंत्री कसा हवा तर अजितदादांसारखा असावा. वास्तविकता दाखवणारा पण राज्याच्या प्रगतीला न थांबवणारा हवा. एखादी योजना आणायची असेल तर पैशांची अडचण असल्यास तसं स्पष्ट सांगायचे. बांधकामाच्या संदर्भात लहानात लहान गोष्टीत अजितदादा जायचे असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.