भोसरी, ता. २४ : इंद्रायणीनगरातील रस्त्याच्या पदपथावर बसविलेल्या पेव्हिंग ब्लॉकची दुरवस्था झाली होती. ते निखळल्याने पदपथावर खड्डे पडले होते. त्यामुळे पदपथ पादचाऱ्यांसाठी धोकादायक झाले होते. या विषयाची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यावर महापालिकेने या पेव्हिंग ब्लॉकची दुरुस्तीस सुरूवात केली आहे.
पदपथावरील काही ठिकाणचे ब्लॉक खचले होते. त्यामुळे पदपथ खाचखळग्यांचा आणि ओबडधोबड झाला होता. ज्येष्ठ नागरिकांना अशा पदपथावरून त्रासदायक ठरत होते. इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक दोनमधील आजूबाजूच्या परिसरातील अर्बन स्ट्रीट योजनेअंतर्गत बसवलेले आणि पेठ क्रमांक एकमधील श्री साई चौक ते मिनी मार्केट, पेठ क्रमांक तीनमधील कालीमाता मंदिर ते स्पाइन रस्त्याकडे जाणाऱ्या पदपथावरील पेव्हिंग ब्लॉक खचले होते. या विषयाची बातमी प्रसिद्ध झाल्यावर याची दखल घेत महापालिकेने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.