वाई:-प्रतिक थिएटर्स आयोजित जिल्हास्तरीय अभिवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न.
esakal February 25, 2026 12:45 PM

साताऱ्याचा जागृती कला मंच प्रथम

वाईत जिल्हास्तरीय अभिवाचन स्पर्धेस प्रतिसाद

वाई, ता. २४ : येथील प्रतीक थिएटर्स आयोजित जिल्हास्तरीय अभिवाचन स्पर्धेत जागृती कलामंच, सातारा यांच्या “आम्ही दोघेच राहायचो घरात” या अभिवाचनास सांघिक प्रथम पारितोषिक मिळाले.
येथील सत्यवती जोशी सभागृहात ही स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. स्पर्धेस जिल्हाभरातील विविध कलामंचांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमास संस्थेचे आजी- माजी पदाधिकारी, सभासद, तसेच साहित्यप्रेमी उपस्थित होते. स्पर्धकांनी निवडलेल्या कथा, साहित्यकृती व सादरीकरणातील भावपूर्णता यामुळे संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले. स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण समारंभ झाला. यानंतर संस्थेच्या सभासदांची बैठक पार पडली. सांघिक द्वितीय पारितोषिक अभिव्यक्ती, वाई यांच्या “दिल, दौलत, दुनियादारी” या कथेस मिळाले. सांघिक तृतीय पारितोषिक द स्टेज, सातारा यांच्या “विटेवरचा विसावा” या सादरीकरणास देण्यात आले. सांघिक उत्तेजनार्थ पारितोषिक क्षणभर विरंगुळा, वाई यांच्या “साष्टांग नमस्कार” या अभिवाचनास प्रदान करण्यात आले. पुरुष वैयक्तिकमध्ये प्रथम पारितोषिक रवी इनामदार (सातारा), तर द्वितीय पारितोषिक अजित क्षीरसागर (वाई) यांनी पटकाविले. स्त्री वैयक्तिकमध्ये तृप्ती शेलार-मोहिते (वाई) यांना प्रथम पारितोषिक मिळाले. द्वितीय पारितोषिक श्रुती मुळे (वाई) यांनी मिळविले, तर विशेष उल्लेखनीय पारितोषिके पूनम ससाणे व सलोनी सरतापे यांना प्रदान करण्यात आली.

----
छायाचित्र ओळी
07619
वाई : प्रतीक थिएटर्स आयोजित जिल्हास्तरीय अभिवाचन स्पर्धेतील विजेत्यांसमवेत संस्थेचे पदाधिकारी व इतर.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.