Arijit Singh Emotional Post Viral: बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक अरिजीत सिंह याने प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. 27 जानेवारीला त्याने नव्या प्रोजेक्ट्स स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलेलं. त्याच्या या घोषणेमुळे त्याच्या कोट्यवधी चाहत्यांचा हिरमोड झाला. करिअरच्या शिखरावर असताना अरिजितने असा निर्णय का घेतला याचं कारण त्याने उघड केलं नाही. मात्र आता जवळपास महिनाभरानंतर त्याने चाहत्यांसाठी एक भावनिक पोस्ट शेअर करत अनेक प्रश्नांना अप्रत्यक्ष उत्तर दिलं आहे. ( Arijit Singh )
24 फेब्रुवारीला एक्स (X) अकाउंटवर अरिजीतने लिहिलं, “हा संदेश फक्त माझ्या श्रोत्यांसाठी आहे. जर तुम्ही माझे श्रोते नसाल, तर कृपया हे वाचू नका. ही विनम्र विनंती आहे.” या पोस्टच्या सुरुवातीलाच त्याच्या भावनांची तीव्रता जाणवत होती.
पुढे तो म्हणाला, “नमस्कार प्रिय फॅन्स, मी तुम्हा सगळ्यांवर प्रेम करतो. या निर्दयी जगात तुमच्या प्रेम आणि विनम्रतेबद्दल मनापासून धन्यवाद. मी नवीन असाइनमेंट्स घेणं थांबवलं असलं, तरी अजून अनेक गाणी प्रलंबित आहेत. ती एक-एक करून रिलीज होत राहतील. कदाचित संपूर्ण वर्षभर... कदाचित पुढच्या वर्षापर्यंतही.”
लोकांना वारंवार समजावण्यात वेळ वाया घालवू नका, शांत राहा, स्वतःची काळजी घ्या, वाचा, प्रेम करा, ध्यान करा, असा सल्लाही त्याने चाहत्यांना दिला. “जय देवी” असा शेवट करत त्याने पोस्ट पूर्ण केली.
This message is just for my listeners
— WhoamI (@Atmojoarjalojo) February 24, 2026
please dont read and swipe right now if you are not my listener, its a humble request.
Hello beautiful people! ❤️
I just want to tell you all that I love you.
Thank you so much for your kindness in this ruthless world.
Although I have…
यानंतर अरिजीतने आणखी एक ट्वीटही केलं “आणि मग पुढे काय होईल, कोण जाणे...” या एका वाक्याने चाहत्यांमध्ये पुन्हा चर्चा रंगली आहे. तो खरंच कायमचा प्लेबॅकपासून दूर राहणार की भविष्यात पुनरागमन करणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
27 जानेवारीला इंस्टाग्रामवर पोस्ट करत अरिजीतने जाहीर केलं होतं की तो प्लेबॅक व्होकलिस्ट म्हणून कोणतेही नवीन असाइनमेंट्स स्वीकारणार नाही. “इतक्या वर्षांत दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. हा प्रवास सुंदर होता,” असं त्याने लिहिलं होतं. मात्र संगीतावरील प्रेम कायम राहील आणि तो शिकत राहील, असंही स्पष्ट केलं होतं.
अरिजीतला संगीताचा वारसा घरातूनच लाभला. त्याची आई शास्त्रीय गायिका होती, तर मावशी तबलावादक. लहानपणापासून संगीताचं शिक्षण घेतलेल्या अरिजीतने 2005 मध्ये ‘फेम गुरुकुल’ या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला. पण त्याच्या करिअरला खरं वळण मिळालं ते Aashiqui 2 मधील ‘तुम ही हो’ या गाण्यामुळे. त्या एका गाण्याने तो घराघरात पोहोचला आणि बॉलिवूडचा आघाडीचा गायक बनला. आजही त्याचा आवाज लाखो चाहत्यांसाठी आधार आहे. तो नवे प्रोजेक्ट्स घेणार नसला, तरी त्याची प्रलंबित गाणी पुढील काळात रिलीज होत राहणार आहेत. मात्र त्याच्या ‘पुढे काय होईल’ या प्रश्नाने चाहत्यांच्या मनात आशेची एक किरण नक्कीच जिवंत ठेवली आहे.