रस्त्याच्या मध्यभागी 'मृत्यूचा सापळा'
esakal February 25, 2026 12:45 PM

टिटवाळ्यात ''मृत्यूचा सापळा''
रस्त्यातील दुभाजकामुळे अपघाताची भीती

टिटवाळा, ता. २४ (वार्ताहर) : टिटवाळा शहरात वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. टिटवाळा पूर्वेकडील गणेश मंदिर रोडवर ममता ज्वेलर्ससमोर लोखंडी दुभाजकाचा मोठा भाग उखडून रस्त्यावर अडवा पडला आहे. उघड्यावर असलेल्या या लोखंडी गजांमुळे आणि सिमेंटच्या तुकड्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

लोखंडी गजांचा तुकडा मूळ पाया सोडून रस्त्याच्या मध्यभागी आल्याने वेगात येणाऱ्या वाहनचालकांना तो वेळीच लक्षात येत नाही. रात्रीच्या वेळी या परिसरात अंधार असल्याने दुचाकीस्वारांना हा अडथळा अगदी जवळ येईपर्यंत दिसत नाही, ज्यामुळे अचानक ब्रेक मारल्याने घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. पावसामुळे रस्ता आधीच घसरडा झाला असून, हा सिमेंटचा तुकडा ''स्पीड ब्रेकर'' ऐवजी ''डेथ ट्रॅप'' ठरत आहे. हा केवळ तुटलेला डिव्हायडर नसून प्रशासनाने लावलेला मृत्यूचा सापळा आहे. अपघात होऊन कुणाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक व व्यापारी व्यक्त करीत आहेत.

प्रशासनाची निष्क्रियता की दुर्लक्ष?
काही दिवसांपूर्वीच याच गणेश मंदिर रोडवर भरधाव डम्परने भीषण अपघात घडवला होता. त्या घटनेनंतर तरी प्रशासन जागे होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मुख्य रस्त्यावरील हा तुटलेला डिव्हायडर प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचे जिवंत उदाहरण ठरत आहे.

तातडीच्या उपाययोजनांची मागणी
परिसरात दुकाने आणि फेरीवाल्यांची मोठी वर्दळ असते. जड वाहनांचा बेफाम वेग आणि रस्त्यातील हे अडथळे यामुळे टिटवाळेकर जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. संभाव्य भीषण अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने तत्काळ हा डिव्हायडर दुरुस्त करावा, अशी आग्रही मागणी टिटवाळावासीयांनी केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.