विकासनगरला भुयारी मार्गाचे काम वेगात
esakal February 26, 2026 09:45 AM

किवळे, ता. २५ : कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावरील वाढती वाहतूक आणि वारंवार होणारे अपघात लक्षात घेऊन किवळे हद्दीतील विकासनगर परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत (एनएचएआय) सुमारे १८ कोटी रुपये खर्चून वाहनांसाठी भुयारी मार्ग उभारण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. स्थानिक नागरिकांसाठी हा भुयारी मार्ग अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.
गेल्या काही वर्षांत किवळे, रावेत, विकासनगर तसेच मुकाई चौकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती उभ्या राहिल्यामुळे स्थानिक वाहतुकीचा ताण वाढला आहे. बाह्यवळण महामार्ग ओलांडताना नागरिकांना मोठा धोका पत्करावा लागत आहे. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्यावेळी वाहतूक कोंडी व अपघातांची शक्यता वाढत होती. या पार्श्वभूमीवर वाहनांसाठी महामार्ग प्राधिकरणामार्फत स्वतंत्र भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
सध्या त्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून बाजूंचे रॅम्प, संरक्षण भिंती तसेच पाणी निचरा व्यवस्था विकसित करण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी विशेष सांडपाणी प्रणाली बसविण्यात येत असल्याची माहिती स्थानिक स्तरावरून मिळत आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी हा मार्ग लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे. भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर किवळे, रावेत परिसरातील अंतर्गत वाहतूक सुलभ होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुढील टप्प्यात रस्त्याचे डांबरीकरण, वीज व्यवस्था व सुरक्षा उपाययोजना करण्यात येणार आहेत. या कामाबाबत अधिकृत माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

बाह्यवळण मार्ग ओलांडताना नागरिकांना मोठा धोका पत्करावा लागत होता. भुयारी मार्ग सुरू झाल्यानंतर वाहतूक सुरक्षित होईल आणि परिसरातील कोंडीही कमी होईल.
- राजेश मांढरे, स्थानिक नागरिक, विकासनगर
KIW26B05443

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.