लालबागच्या राजाचा शैक्षणिक क्रांतीचा ''श्रीगणेशा''; डॉ. अच्युत गोडबोले यांच्या हस्ते ''एआय डिजिटल ग्रंथालया''चे शानदार लोकार्पण
esakal February 26, 2026 09:45 AM

लालबागच्या राजाचा शैक्षणिक क्रांतीचा ‘श्रीगणेशा’; डॉ. अच्युत गोडबोले यांच्या हस्ते ‘एआय डिजिटल ग्रंथालया’चे शानदार लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २५ : प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाच्या चरणी दरवर्षी कोट्यवधींचे दान जमा होते. मात्र, हे मंडळ केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही मोठे कार्य करते. याच सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मंगळवारी (ता. २४) अत्याधुनिक ‘एआय डिजिटल ग्रंथालया’चे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले.
लालबाग येथील ‘पेरू चाळ’ परिसरातील ‘लालबागचा राजा प्रबोधिनी’मध्ये हे अद्ययावत ग्रंथालय साकारण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ आणि ज्येष्ठ लेखक डॉ. अच्युत गोडबोले यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, नगरसेविका भारती पेडणेकर आणि नगरसेवक किरण तावडे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉ. अच्युत गोडबोले म्हणाले की, सध्याचे युग हे ‘एआय’चे युग असून, संपूर्ण जगात यामुळे झपाट्याने क्रांती होत आहे. या बदलत्या काळाचा आणि एआयचा सामना करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहणे काळाची गरज आहे. आज प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर वाढला असून, भविष्यात तो आणखी व्यापक होईल. मात्र, या तंत्रज्ञानामुळे घाबरून न जाता, आपण त्याशी समरस होऊन आवश्यक कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. ते पुढे म्हणाले, एआयमुळे नोकऱ्या जातील ही भीती अनाठाई आहे. काही पारंपरिक कामे कमी होणार असली तरी, या तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. केवळ तंत्रज्ञान आत्मसात करून न थांबता, त्यातील नवनवीन कौशल्ये विकसित करणे हीच काळाची पावले ओळखण्यासारखे आहे.’
हे ग्रंथालय केवळ पुस्तकांचा संग्रह नसून, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने चालणारे देशातील एक महत्त्वाचे ज्ञानकेंद्र ठरणार आहे. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी हे ग्रंथालय पूर्णपणे विनामूल्य असेल. हाय-स्पीड इंटरनेटसह आधुनिक संगणक प्रणाली आणि एआय तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना हवी असलेली माहिती, संदर्भ आणि जागतिक दर्जाची ई-पुस्तके एका क्लिकवर उपलब्ध होतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठी हे केंद्र एक वरदान ठरेल. डिजिटल युगात तरुणाईला पुन्हा वाचनाकडे वळवण्यासाठी आणि त्यांना जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी हे व्यासपीठ मदतीचे ठरेल.
मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मानद सचिव सुधीर साळवी आणि खजिनदार मंगेश दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पूर्ण झाला आहे. ‘राजाच्या दर्शनाला येणारा प्रत्येक तरुण हातामध्ये पदवी घेऊन आणि डोळ्यात स्वप्न घेऊन येतो. त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी हे एआय डिजिटल ग्रंथालय महत्त्वाची भूमिका बजावेल,’ असा विश्वास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. लालबागचे मंडळ यापूर्वीच डायलिसिस सेंटर, रुग्णवाहिका सेवा आणि ग्रंथालय चालवते. आता डिजिटल युगाची गरज ओळखून त्यांनी सुरू केलेले हे पाऊल मुंबईतील शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवणारे ठरेल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.