पिंपरी, ता. २५ ः अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पिंपरी चिंचवड महानगर शाखेतर्फे चिंचवडमधील मॉलमध्ये ‘प्रतापगड पर्व’ हा कथाकथनाचा संगीतमय ऐतिहासिक कार्यक्रम उत्साहात झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेचा आणि प्रतापगडाच्या इतिहासाचा जाज्वल्य स्मरण करून देणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरला. यामध्ये प्रतापगडाच्या लढाईचा इतिहास, शौर्य, रणनीती आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमागील संघर्ष प्रभावी कथन, पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना आणि नाट्यमय सादरीकरणाद्वारे जिवंत करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील नामवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘इतिहासाची जाण आणि राष्ट्रीय अभिमान जागवणारा असा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे,’ असे मत उपस्थित निमंत्रितांनी व्यक्त केले.
-----