वाल्हे, ता. २५ : पुरंदर तालुक्यातील राख परिसरात भीषण पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. येथील चव्हाणवस्ती, धनगरवाडी, पडळकर करे वस्ती, कापडदरा आदी भागांतील विहिरी आटल्या असून कूपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. परिणामी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वाड्यावस्त्यांवर भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या वतीने राख परिसरात तातडीने पिण्याच्या पाण्यासाठी एक टँकर सुरू करण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीच्या प्रस्तावानंतर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे ग्रामसेवक रेवणनाथ होळकर यांनी सांगितले. येथील परिसरातील वाड्यावस्त्यांवरील पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीतील पाणीसाठा संपल्याने नळयोजना बंद पडली आहे. वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे जलाशय आणि विहिरी कोरड्या पडत असून शेतकरी व ग्रामस्थ हतबल झाले आहेत. मात्र, एका टँकरची खेप अपुरी पडत असल्याने शासकीय टँकर त्वरित सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत असल्याचे विनायक पवार यांनी नमूद केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून राखसह नारायणपूर, पोखर, वाल्हे येथील पालखीतळ परिसर, वारवडी चतुरमुख महादेव मंदिर व जेजुरी कडेपठार देवस्थान परिसरातही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
-गजानन पवार, टँकरचालक
जलजीवन मिशनची कामे रखडली
पुरंदर तालुक्यातील अनेक गावांमध्ये ‘हर घर जल’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन योजनेची कामे अद्याप अपूर्ण आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही नळजोडण्या, पाणीटाक्या व पाइपलाइनची कामे रखडल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. टंचाईग्रस्त भागात प्राधान्याने पूर्ण होणे अपेक्षित असलेली ही कामे विलंबाने सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने संबंधित अधिकारी व ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.